१७.१७ कोटींची विकासकामे मार्गी; १३.७९ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता, २२ कामे पूर्ण तर १०९ कामे प्रगतीपथावर
अजून ३.३८ कोटी रुपयांच्या कामांचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत; पालकमंत्री नितेश राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती
कणकवली, दि. १० सप्टेंबर (प्रतिनिधी) : जनता दरबार म्हणजे केवळ आश्वासनांचा सोपस्कार नव्हे, तर नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांचा पाठपुरावा करून त्याचा हिशोब पुन्हा जनतेसमोर मांडण्याची प्रक्रिया आहे, हे सिंधुदुर्गातील पहिल्या वंचित समाजाच्या जनता दरबारातून अधोरेखित झाले आहे. २६ जुलै २०२५ रोजी झालेल्या या जनता दरबारात वंचित समाजातील नागरिकांकडून प्राप्त झालेल्या ४२९ निवेदनांपैकी आतापर्यंत १३.७९ कोटी रुपयांची विकासकामे मंजूर झाली आहेत. त्यापैकी २२ कामे पूर्ण झाली असून १०९ कामे प्रगतीपथावर आहेत. याशिवाय आणखी ३.३८ कोटी रुपयांच्या कामांचे प्रस्ताव मंत्रालय स्तरावर पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे एकूण सुमारे १७.१७ कोटी रुपयांची विकासकामे मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.
कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री राणे यांनी जनता दरबारानंतर झालेल्या कार्यवाहीचा आढावा मांडला.
४२९ निवेदनांवर प्रत्यक्ष कार्यवाही
पहिल्या वंचित समाजाच्या जनता दरबारात जिल्ह्यातील वंचित समाजातील नागरिकांनी रस्ते, मूलभूत सुविधा, विकासकामे, सामाजिक प्रश्न तसेच विविध प्रशासकीय मागण्यांसंदर्भात तब्बल ४२९ निवेदने सादर केली होती. यातील काही मागण्या मंत्रालय स्तरावरील, तर काही जिल्हा पातळीवरील होत्या.
जिल्हाधिकारी, समाजकल्याण विभाग आणि विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या मागण्या स्वीकारण्यात आल्या होत्या. त्यानंतर संबंधित मागण्यांचा सातत्याने पाठपुरावा करण्यात आल्याचे राणे यांनी सांगितले.
१३.७९ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता
प्राप्त निवेदनांमधील मागण्यांनुसार पहिल्या टप्प्यात १३.७९ कोटी रुपयांच्या विकासकामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या कामांची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, कामे केवळ मंजूर करून थांबविण्यात येणार नाहीत, तर ती दर्जेदार आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.
आतापर्यंत २२ कामे पूर्ण, तर १०९ कामे प्रगतीपथावर असल्याचेही त्यांनी सांगितले.
आणखी ३.३८ कोटींचे प्रस्ताव
पहिल्या टप्प्यातील मंजूर कामांव्यतिरिक्त मंत्रालय स्तरावरील आणखी ३.३८ कोटी रुपयांच्या कामांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे जनता दरबारातील मागण्यांमधून सुमारे १७.१७ कोटी रुपयांची विकासकामे मार्गी लावण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
‘प्रसिद्धीसाठी नव्हे, कामाचा हिशोब देण्यासाठी जनता दरबार’
“जनता दरबार घेऊन केवळ प्रसिद्धी मिळविणे हा उद्देश नाही. नागरिकांनी केलेल्या मागण्यांचा पाठपुरावा करून त्याचा हिशोब जनतेसमोर मांडणे हे आपले कर्तव्य आहे,” असे नितेश राणे यांनी स्पष्ट केले.
वंचित समाजाच्या विकासासाठी जनता दरबारातून प्राप्त झालेल्या मागण्यांना प्राधान्य देण्यात आले असून, सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
जातिवाचक गावांची नावे बदलली
जनता दरबारात जिल्ह्यातील काही गावांची पूर्वीची जातिवाचक किंवा आक्षेपार्ह नावे बदलण्याची मागणीही नागरिकांनी केली होती. लोकांच्या इच्छेनुसार अशा गावांची नावे बदलण्यात आली असून, हा देखील सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा निर्णय असल्याचे राणे यांनी नमूद केले.
वंचित समाजाच्या वाढीवस्त्यांमध्ये जीवनावश्यक आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांच्या पाठपुराव्याचे श्रेय
या कामांच्या पाठपुराव्यात जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे, निवृत्त अधिकारी अजयकुमार सर्वगोड आणि पालकमंत्री संपर्क कार्यालयाचे प्रमुख मनोज भोगटे यांचे सातत्यपूर्ण योगदान असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले.
गणेशोत्सवानंतर दुसरा जनता दरबार
गणेशोत्सवानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुसरा वंचित समाजाचा जनता दरबार आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही पालकमंत्री राणे यांनी दिली. या जनता दरबारात नव्याने प्राप्त होणाऱ्या निवेदनांनुसार पुढील विकासकामांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली, जिल्ह्यातील आमदार आणि खासदार नारायण राणे यांच्यासह सर्वांना सोबत घेऊन वंचित समाजाच्या उन्नतीसाठी काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कृतीतून विकासकामे करून दाखविण्यावर भर असून, जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात मंजूर झालेली कामे पूर्ण झाल्यानंतर वंचित समाजातील नागरिकांच्या मागण्या प्रत्यक्षात पूर्ण होतील आणि त्यातून त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला.






