आधार प्रमाणीकरणासाठी यादी प्रसिद्ध; पात्र शेतकऱ्यांनी ‘आपले सरकार’ किंवा महा ई-सेवा केंद्रावर प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन
सिंधुदुर्ग, दि. ११ (जिमाका) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत राज्यातील ३.५५ लाख पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी शासनामार्फत ११ सप्टेंबर २०२६ रोजी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६३९ पात्र शेतकऱ्यांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थांशी संबंधित २२४ शेतकरी, तर राष्ट्रीयीकृत व ग्रामीण बँकांशी संबंधित ४१५ शेतकऱ्यांचा समावेश आहे.
पात्र शेतकऱ्यांची यादी संबंधित विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालय तसेच तालुका सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
याशिवाय संबंधित विकास संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, बँक शाखा, ग्रामपंचायत कार्यालय आणि तलाठी कार्यालय येथेही पात्र लाभार्थ्यांची माहिती प्रसिद्ध करण्याची कार्यवाही सुरू आहे. उर्वरित पात्र कर्जदारांची यादी पुढील १५ दिवसांत टप्प्याटप्प्याने आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.
आधार प्रमाणीकरण आवश्यक
या योजनेअंतर्गत कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यासाठी यादीत समाविष्ट असलेल्या पात्र शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या ‘आपले सरकार’ केंद्र अथवा महा ई-सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे.
आधार प्रमाणीकरणासाठी शेतकऱ्यांनी आधार कार्ड, ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी, कर्ज खात्याचे पासबुक आणि बचत खात्याचे पासबुक सोबत घेऊन जावे.
आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी कोणत्याही केंद्रावर आधार प्रमाणीकरणासाठी कोणतीही रक्कम देऊ नये, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक प्रदीप मालगावे यांनी केले आहे.





