मालवण दि. (प्रतिनिधी):
दैनंदिन जीवनात गणिताचे महत्त्व अत्यंत मोलाचे असून विद्यार्थ्यांच्या मूलभूत गणितीय संकल्पना शालेय स्तरावर भक्कम होणे आवश्यक आहे. गणितोत्सवासारखे उपक्रम विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी उपयुक्त ठरतात. स्पर्धांमध्ये केवळ बक्षीस मिळवण्याच्या उद्देशाने नव्हे, तर स्वतःच्या ज्ञानाची कसोटी पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे प्रतिपादन कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या शालेय समितीचे अध्यक्ष श्री. सुधीर उर्फ बापू वराडकर यांनी केले.
कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या गणित विभागातर्फे आयोजित ‘गणितोत्सव २०२५-२६’ चे उद्घाटन श्री. वराडकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे, पर्यवेक्षक श्री. महेश भाट, गणित विभागप्रमुख श्री. प्रकाश कानूरकर, सौ. वीणा शिरोडकर, कु. अमिषा परब तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री. प्रकाश कानूरकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. गणितोत्सवानिमित्त गणितीय निबंध स्पर्धा, गणितीय रांगोळी स्पर्धा, पाढे पाठांतर स्पर्धा तसेच गणितीय प्रश्नमंजुषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी रांगोळीच्या माध्यमातून विविध भूमितीय आकृती साकारत गणितातील संकल्पना प्रभावीपणे मांडल्या, तर निबंध स्पर्धेत गणिताचे जीवनातील महत्त्व अधोरेखित केले.
पाढे पाठांतर व प्रश्नमंजुषा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी आपली गणितीय क्षमता दाखवून दिली. विद्यार्थ्यांमधील गणित विषयाची भीती दूर व्हावी आणि मूलभूत संकल्पना अधिक दृढ व्हाव्यात या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
गणितोत्सवाचे नियोजन गणित विभागप्रमुख श्री. प्रकाश कानूरकर, सौ. वीणा शिरोडकर आणि कु. अमिषा परब यांनी केले. यावेळी भूमितीय संकल्पनांवर आधारित रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटनही श्री. वराडकर यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.








