मालवण | प्रतिनिधी
मालवणच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग असलेल्या मामा वरेरकर नाट्यगृहाची दिवसेंदिवस होत चाललेली दुरवस्था आता नाट्यप्रेमी आणि कलाकारांच्या संतापाचा विषय ठरली आहे. नाट्यगृहाच्या समस्यांकडे नगरपालिका प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत मालवणातील नाट्यप्रेमी नागरिक एकत्र आले असून तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मालवण येथील नगर वाचन मंदिरात ‘आम्ही मालवणकर’ या उपक्रमांतर्गत आयोजित बैठकीत नाट्यगृहाच्या सद्यस्थितीवर सखोल चर्चा करण्यात आली. वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून केवळ तात्पुरत्या स्वरूपाच्या दुरुस्त्याच केल्या जात असल्याने उपस्थितांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
नुकत्याच सादर झालेल्या ‘आमने-सामने’ या नाटकाच्या प्रयोगानंतर ज्येष्ठ कलाकार लीना भागवत आणि मंगेश कदम यांनी रंगमंचावरूनच नाट्यगृहातील समस्यांकडे लक्ष वेधले होते. या घटनेमुळे राज्यभरात मालवणच्या सांस्कृतिक केंद्राची झालेली बदनामी ही अत्यंत खेदजनक असल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले.
नाट्यगृहाचे गळके छप्पर, जीर्ण रंगमंच, अपुरी प्रकाश व्यवस्था, बंद पडलेली ध्वनी प्रणाली तसेच विंगेतील अस्वच्छता यामुळे बाहेरील कलाकारांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचेही सांगण्यात आले. मालवणी संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या शहरातील प्रमुख नाट्यगृहाची अशी अवस्था असणे ही मालवणकरांसाठी लज्जास्पद बाब असल्याची भावना व्यक्त झाली.
या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा, मुख्याधिकारी तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना सविस्तर निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच नाट्यगृहाच्या प्रश्नावर सातत्याने पाठपुरावा करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याचेही ठरविण्यात आले.
प्रशासनाने तातडीने ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना न केल्यास आगामी काळात तीव्र लोकआंदोलन उभारले जाईल, असा इशारा बैठकीत देण्यात आला. मालवणचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आणि भावी पिढ्यांसाठी नाट्यगृह सुस्थितीत ठेवणे ही काळाची गरज असल्याचा ठाम संदेश यावेळी देण्यात आला.
बैठकीस नितीन वाळके, भालचंद्र केळूसकर, संजय शिंदे, गौरव ओरसकर, बलराम सामंत, ॲड. आसोलकर, शुभदा टिकम, सचिन टिकम, उमेश मेस्त्री, सुनील परुळेकर, रुपेश नेवगी, लारा मयेकर, राजू कदम, महेश काळसेकर, सुधीर गोसावी, हनु हडकर, नागेश परब, महेंद्र पराडकर यांच्यासह अनेक नाट्यप्रेमी उपस्थित होते.







