मुंबई : बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षेत असलेल्या मुंबई–विजयदुर्ग रोरो सेवेला अखेर मुहूर्त मिळाला असून १ मार्चपासून ही सेवा अधिकृतपणे सुरू होत आहे. मुंबईतील भाऊचा धक्का येथून ही रोरो फेरी सुटणार असून कोकणातील प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे.
पहिली फेरी १ मार्चला सकाळी ८ वाजता
रोरो सेवा १ मार्च रोजी सकाळी ८ वाजता भाऊच्या धक्क्यावरून सुटणार असून दुपारी ३ वाजता विजयदुर्ग येथे पोहोचणार आहे. या पहिल्या फेरीत महाराष्ट्राचे बंदरे विकास मंत्री नितेश राणे स्वतः उपस्थित राहणार आहेत. त्यांनी या प्रवासासाठी तिकीटही बुक केले असल्याची माहिती मिळाली आहे.
परतीची फेरी २ मार्चला
२ मार्च रोजी विजयदुर्ग येथून दुपारी १२ वाजता सुटणारी रोरो फेरी सायंकाळी ७ वाजता मुंबईत दाखल होणार आहे. त्यामुळे मुंबई–कोकण दरम्यानचा प्रवास वेळेची बचत करणारा आणि अधिक आरामदायी ठरणार आहे.
महाराष्ट्र सागरी मंडळाचा उपक्रम
ही सेवा महाराष्ट्र सागरी मंडळ यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. रोरो (Roll-on/Roll-off) सेवेमुळे प्रवासी तसेच वाहनांसह प्रवास करणे शक्य होणार आहे, ज्यामुळे रस्ते प्रवासाचा ताण कमी होईल.
कोकण पर्यटनाला चालना
मुंबई ते कोकण असा थेट सागरी मार्ग उपलब्ध झाल्याने कोकणातील पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. विशेषतः विजयदुर्ग परिसर, ऐतिहासिक किल्ले, समुद्रकिनारे आणि स्थानिक पर्यटन व्यवसाय यांना या सेवेमुळे फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मुंबई–कोकण प्रवास अधिक सोपा, जलद आणि पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने ही रोरो सेवा महत्त्वाची पायरी ठरत आहे.







