मुंबई, दि. २० : नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अवकाळी पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा झाडांना मोहर येण्यास उशीर झाला. त्यानंतर डिसेंबरपासून सातत्याने कमी तापमान आणि थंड वातावरण राहिल्याने आंब्यांवर चांगला मोहर आला. मात्र तिसरा मोहोर आल्यानंतर त्यातून नेमके किती उत्पादन मिळेल, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यामुळे कृषी विभागाने यासंदर्भात सविस्तर अहवाल तयार करून तो तात्काळ शासनाकडे सादर करावा, असे निर्देश मत्स्यव्यवसाय, बंदरे तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.
मंत्रालयात आढावा बैठक
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा पिकांवर आलेल्या रोगामुळे झालेल्या नुकसानीबाबत उपाययोजना करण्यासाठी मंत्रालयात पालकमंत्री राणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीस सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठचे उपकुलगुरू डॉ. संजय भावे, संशोधन संचालक डॉ. व्ही. यू. शहारे, फलोत्पादन संचालक अंकुश माने, वनस्पतीरोग शास्त्रज्ञ डॉ. पुष्पा पाटील, कीटकशास्त्र विभागप्रमुख डॉ. विजय देसाई, कृषी विभागाचे अवर सचिव डॉ. ललितकुमार धायगुडे तसेच आंबा व इतर फळ बागायती शेतकरी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
नैसर्गिक आपत्ती जाहीर करण्याची मागणी
कोकणातील अनेक भागांत अपेक्षित प्रमाणात मोहर न आल्याने आंबा उत्पादकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. याशिवाय, पुढील काळात अवकाळी पाऊस किंवा तापमानात तीव्र वाढ झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. त्यामुळे या परिस्थितीला नैसर्गिक आपत्ती घोषित करून कोकणातील आंबा बागायतदारांना शासन मोठ्या प्रमाणात मदत करेल, असा विश्वास मंत्री राणे यांनी व्यक्त केला.
कीटकनाशक वापरावर धोरण आवश्यक
आंबा पिकांवर विविध कीटकनाशकांची अतिरेकी फवारणी केल्यास उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याचेही बैठकीत नमूद करण्यात आले. यासाठी शास्त्रीय व दीर्घकालीन धोरण ठरविण्याची गरज असल्याचे पालकमंत्री राणे यांनी सांगितले. कृषी विद्यापीठांना अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येणार असून, कोकणातील आंबा उत्पादन वाढीसाठी परदेशी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्याबाबतही सकारात्मक भूमिका घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदारांना दिलासा देण्यासाठी शासन स्तरावर लवकरच ठोस निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







