The first official Heritage Walk in Malvan was successfully organized on Shivjayanti by S.K. Patil Sindhudurg College. Participants explored Dongurla Lake, Koper Dhopar, Morayacha Dhonda, and learned about Sindhudurg Fort’s historical significance.
मालवण (प्रतिनिधी): मालवण शहराच्या समृद्ध ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि वारसा स्थळांची ओळख करून देणाऱ्या हेरिटेज टूर गाईड प्रमाणपत्र अभ्यासक्रमांतर्गत प्रथम अधिकृत हेरिटेज वॉक शिवजयंती दिनी उत्साहात पार पडला. स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) व लेखाशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या हेरिटेज वॉकमध्ये २० जणांनी सहभाग घेतला.
डोंगुर्ला तलावातून सुरुवात
हेरिटेज वॉकची सुरुवात कुंभारमाठ येथील डोंगुर्ला तलाव येथे करण्यात आली. तलावाच्या दोन भागांतील जलव्यवस्थापन पद्धतीचा अभ्यास सहभागीनी प्रत्यक्ष पाहणीद्वारे केला. त्यानंतर शासकीय पॉलिटेक्निक, मालवण परिसरातील ऐतिहासिक विहिरीला भेट देण्यात आली. इतिहास तज्ज्ञ डॉ. ज्योती बुवा तोरसकर यांनी शिवकालीन जलव्यवस्थापन प्रणालीचे महत्त्व तलाव व विहिरीच्या उदाहरणातून स्पष्ट केले.
कोपर ढोपर येथे ऐतिहासिक माहिती
यानंतर सहभागीनी कोपर ढोपर या स्थळाला भेट दिली. पर्यटन तज्ज्ञ गुरुनाथ राणे यांनी या ठिकाणाचे ऐतिहासिक महत्त्व सांगताना सिंधुदुर्ग किल्लाच्या संरक्षणासाठी आणि सागरी हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी हे ठिकाण महत्त्वाचे असल्याचे नमूद केले.
मोरयाचा धोंडा येथे सांगता
हेरिटेज वॉकचा शेवट मोरयाचा धोंडा या ऐतिहासिक स्थळी झाला. यावेळी डॉ. ज्योती तोरसकर आणि गुरुनाथ राणे यांनी या स्थळाचे धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व उलगडून सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामापूर्वी याच ठिकाणी देवतांची पूजा केली होती, अशी ऐतिहासिक माहिती त्यांनी दिली. हरी केळुस्कर यांच्या हस्ते मोरयाचा धोंडा येथे पुष्पहार अर्पण करून शिवजयंती साजरी करण्यात आली.
प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष अनुभव
अभ्यासक्रमाच्या समन्वयक डॉ. सुमेधा नाईक यांनी सर्व सहभागींचे आभार मानत सांगितले की, या उपक्रमामुळे प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष स्थळभेटीद्वारे मालवणच्या वारशाचे सखोल ज्ञान मिळाले असून भविष्यात सक्षम व विश्वासार्ह हेरिटेज टूर गाईड तयार होण्यास मोठी मदत होईल.
या हेरिटेज वॉकमध्ये डॉ. ज्योती तोरसकर, गुरुनाथ राणे, हेमंत वालकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, डॉ. सुमेधा नाईक, हरी केळुस्कर, संजय मळेकर, निखिल नेरकर, प्रीती वैद्य, पूर्वा तारी, शुभदा पेडणेकर, हनुमंत हडकर, कौस्तुभ बापर्डेकर, निखिल तेली, पूजा भोगावकर, स्वप्नील मिटकर, अंबाजी वालकर, सायली मयेकर, पांडुरंग तोंडवळकर आणि मारी फर्नांडिस यांनी सहभाग घेतला.
हा उपक्रम यशस्वी केल्याबद्दल कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, सचिव चंद्रशेखर कुशे, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष ॲड. समीर गवाणकर तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.







