Senior writer Kalpana Malye emphasized the importance of cultivating reading habits among children while speaking at a joint birth anniversary celebration of Savitribai Phule, Rajmata Jijau and Mata Ramai in Malvan.
मालवण वार्ताहर
आजच्या युवा पिढीत वाचनाचे प्रमाण घटत चालले असून समाजातील घडामोडींबाबतची जाणीव कमी होत आहे. युवा पिढीचा समाजाशी असलेला संवाद पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी पालकांनी मुलांना वाचनाची सवय लावावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका कल्पना मलये यांनी केले.
मालवण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन कट्टा येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. भारतीय बौद्ध महासभा तालुका महिला शाखा मालवण यांच्या वतीने सावित्रीबाई फुले, जिजाबाई (राजमाता जिजाऊ) आणि रामाबाई आंबेडकर (माता रमाई) यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेहा काळसेकर होत्या. प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा सरचिटणीस संजय पेंडूरकर, महिला संस्कार उपाध्यक्ष स्नेहा पेंडुरकर, जिल्हा संस्कार सचिव विलास वळंजु, जिल्हा महिला संरक्षण उपाध्यक्ष प्रीतम जाधव, तालुकाध्यक्ष रविकांत कदम, तालुका सरचिटणीस प्रकाश पवार, तालुका संरक्षण उपाध्यक्ष भगवान जाधव, संस्कार उपाध्यक्ष नचिकित पवार, पर्यटन सचिव सचिन कासले, संग्राम कासले, संस्कार सचिव मिलिंद पवार, लक्ष्मण तळेगावकर, भानुदास तळगावकर, आरपीआय जिल्हाध्यक्ष अजित कदम, हिशेब तपासणी शंकर कदम, भरत पेंडूरकर, संघटक लीना तळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्नेहा पेंडुरकर यांनी केले.
संघर्षातून घडलेले प्रेरणादायी कार्य
कल्पना मलये म्हणाल्या की, जीवनात प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो; मात्र क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ आणि त्यागमूर्ती माता रमाई यांचा संघर्ष कित्येक पटीने मोठा होता. त्यांच्या त्याग आणि कार्यामुळेच आज महिलांना सन्मानाने व स्वाभिमानाने जीवन जगता येते, याची जाणीव प्रत्येक महिलांनी ठेवली पाहिजे.
तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या मताधिकारामुळे महिलांना स्वतंत्र ओळख आणि अस्तित्व प्राप्त झाले आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये समाजात रुजवण्यासाठी महामानवांच्या विचारांचा प्रचार व प्रसार होणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
बालकांकडून व्यक्तिरेखांचे सादरीकरण
कार्यक्रमात लहान मुलांनी सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, माता रमाई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिरेखा साकारून उपस्थितांची मने जिंकली. सूत्रसंचालन तृप्ती कांबळे यांनी केले.
या कार्यक्रमातून वाचन संस्कृती, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक मूल्यांची जपणूक यांचा प्रभावी संदेश देण्यात आला.








