A blood donation camp was organized at Kalyan Railway Station on the occasion of Mahashivratri by Global Raktadate Konkan Maharashtra, Sindhudurg Red Battalion, and Global Malvani Social Organization, witnessing an enthusiastic response from donors.
कल्याण (प्रतिनिधी):
महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र, सिंधुदुर्ग रेड बटालियन आणि ग्लोबल मालवणी सामाजिक संस्था (रजि.) यांच्या संयुक्त विद्यमाने १५ फेब्रुवारी रोजी प्रथमच कल्याण रेल्वे स्टेशन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
ग्लोबल रक्तदाते संघटक श्री. सागर चव्हाण आणि सदानंद चव्हाण यांच्या कुटुंबातील सात सदस्यांनी डोंबिवलीहून येऊन कुटुंबीय रक्तदान करून महाशिवरात्री साजरी केल्याचे समाधान व्यक्त केले. तसेच सिंधुदुर्ग रेड बटालियनमधील प्रदीप चव्हाण आणि अजित सूर्यवंशी यांच्या कल्याणमधील मित्रपरिवारानेही रक्तदान करून सहभाग नोंदवला.
या उपक्रमाला रक्तमित्र परिवाराने दिलेली उपस्थिती आणि सहकार्य प्रेरणादायी ठरले. ग्लोबल रक्तदाते मालवण-सिंधुदुर्गचे रुग्णसेवक श्री. राजेश पारधी यांनी स्वयंप्रेरणेने उपस्थित राहून संपूर्ण आयोजनात सक्रिय सहभाग घेत रुग्णसेवा पार पाडली.
या शिबिरात ६१ वर्षीय आणि आतापर्यंत ६७ वेळा रक्तदान केलेले ठाणे येथील श्री. प्रभात महाजन यांनी स्वयंसेवक म्हणून कार्य करत आपल्या सेवाभावाचा प्रेरणादायी आदर्श घालून दिला.
रक्तसंकलनासाठी जे.जे. महानगर रक्तपेढीच्या सौ. प्रतिभा मॅडम आणि त्यांच्या संपूर्ण स्टाफचे सहकार्य लाभले. तसेच आयोजनासाठी श्री. हेमंत मांडवकर, श्री. विकास सुखी, विनायक पावसकर, प्रदीप चव्हाण, अजित सूर्यवंशी, श्री. सागर चव्हाण, सदानंद चव्हाण आणि किरण पूजारी सर यांचे मोलाचे योगदान राहिले. याशिवाय ब्रह्मकुमारी संस्था, कल्याण यांचेही विशेष सहकार्य लाभले. महाशिवरात्रीच्या निमित्ताने रक्तदानासारख्या सामाजिक उपक्रमातून खऱ्या अर्थाने सेवा आणि भक्तीचा संदेश देण्यात आला.








