मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागात कामगिरीआधारित प्रशासकीय कार्यसंस्कृती रुजविण्याच्या दृष्टीने आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांचे दरवर्षी वस्तुनिष्ठ पद्धतीने गुणांकन करण्यात येणार असून, मागील तीन वर्षांतील कामगिरीच्या आधारे त्यांची श्रेणी निश्चित केली जाणार आहे.
या श्रेणीचा उपयोग अधिकाऱ्यांवरील जबाबदाऱ्यांचे वाटप, पुढील तीन वर्षांचे कार्यनियोजन तसेच भविष्यातील नियुक्त्यांच्या वेळी केला जाणार आहे. त्यामुळे केवळ सेवाज्येष्ठतेपेक्षा प्रत्यक्ष कामगिरीला अधिक महत्त्व मिळण्याची शक्यता आहे.
अधिकाऱ्यांचे मूल्यांकन करताना नेतृत्वक्षमता, रुग्णसेवा, आर्थिक शिस्त, मनुष्यबळ व्यवस्थापन, प्रशासकीय कार्यक्षमता आणि शासनाच्या आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी यांसारख्या बाबींचा विचार केला जाणार आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या क्षमतेनुसार त्यांना पुढील जबाबदाऱ्या आणि संधी देण्याची व्यवस्था निर्माण होणार आहे.
या निर्णयामुळे सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांमध्ये कामगिरी सुधारण्याची स्पर्धात्मक भावना निर्माण होऊन कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तसेच चांगली कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना योग्य संधी मिळाल्याने त्यांचे मनोबलही उंचावणार आहे.
‘कामगिरीला मान्यता आणि गुणवत्तेला संधी’ या सूत्रावर आधारित ही व्यवस्था सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रशासकीय कार्यपद्धतीला नवी दिशा देणारी ठरणार आहे. कामगिरीआधारित मूल्यांकनामुळे आरोग्य यंत्रणेची कार्यक्षमता वाढविण्यासोबतच रुग्णांना मिळणाऱ्या आरोग्यसेवेचा दर्जा उंचावण्यास आणि लोकाभिमुख आरोग्यसेवा अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यास हातभार लागणार आहे.







