मुंबईत आता मालवणी संस्कृतीचा भव्य जागर रंगणार आहे. मालवणी भाषा, लोककला, परंपरा आणि सिंधुदुर्गाच्या मातीतून घडलेल्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यासाठी २५ नोव्हेंबरला ‘मालवणी अभिमान मेळो’ आयोजित करण्यात येणार आहे. तब्बल ७० कलाकारांचा लोककलाविष्कार, १३० कर्तृत्ववान व्यक्तींचा जीवनप्रवास मांडणारं ‘मालवणी रत्ने’ दालन आणि ज्येष्ठ कर्तृत्ववान व्यक्तीला जीवनगौरव पुरस्कार अशा विविध उपक्रमांनी हा मेळावा खास ठरणार आहे.
कणकवली (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याची पायाभरणी केलेल्या २५ नोव्हेंबर या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून दरवर्षी ‘मालवणी अभिमान दिवस’ साजरा करण्याचा संकल्प मुंबईस्थित ‘जय थय मालवणी’ संस्थेने केला आहे. यानिमित्त यंदापासून ‘मालवणी अभिमान मेळो’ आयोजित करण्यात येणार असून, पहिला मेळावा मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर येथे होणार आहे. आमदार प्रमोद जठार यांची या मेळ्याचे यजमान म्हणून निवड करण्यात आली आहे.
याबाबतची घोषणा रविवारी कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली. यावेळी आमदार प्रमोद जठार, ‘जय थय मालवणी’ संस्थेचे प्रमुख पदाधिकारी जयेंद्र साळगावकर, भाऊ कोरगावकर, रजनीश राणे आणि संजीव शिरसाट उपस्थित होते. यावेळी आमदार जठार यांच्या हस्ते ‘मालवणी अभिमान मेळो’च्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.
प्रत्येक मालवणी माणसाचा मेळा
‘मालवणी अभिमान मेळो’ हा कोणत्याही एका पक्षाचा किंवा गटाचा नसून प्रत्येक मालवणी माणसाचा मेळा असेल, असे आमदार प्रमोद जठार यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील सर्व राजकीय नेते, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि मालवणीप्रेमींनी या मेळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
संस्थेच्या वतीने सर्वपक्षीय मालवणी नेते, मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सन्मानपूर्वक निमंत्रण देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक कार्यमंत्री, सिंधुदुर्गचे पालकमंत्री तसेच जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनाही विशेष निमंत्रण दिले जाणार आहे.
७० कलाकार सादर करणार मालवणी लोककला
२५ नोव्हेंबर रोजी दिवसभर विविध सांस्कृतिक आणि मालवणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. सिंधुदुर्गातील तब्बल ७० कलाकार विविध लोककलांचे सादरीकरण करणार आहेत. मेळ्याची सुरुवात सिंधुदुर्ग किल्ल्यावरील पवित्र माती, पाणी आणि तटबंदीचा चिरा यांची पालखी मिरवणूक काढून करण्यात येणार आहे.
‘सिंधुदुर्ग विकास’ या विषयावर चर्चासत्र व परिसंवाद, कवी गुरु ठाकूर यांची मुलाखत आणि मालवणी कवी संमेलन आदी कार्यक्रमही होणार आहेत.
‘मालवणी रत्ने’ दालनातून १३० कर्तृत्ववान व्यक्तींचा प्रवास
मेळ्यात ‘मालवणी रत्ने’ आणि ‘ह्या बघलास काय ता!’ अशी दोन विशेष दालने उभारण्यात येणार आहेत. ‘मालवणी रत्ने’ दालनातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल १३० कर्तृत्ववान व्यक्तींचा जीवनप्रवास आणि कार्य मांडण्यात येणार आहे. तर छायाचित्र दालनातून सिंधुदुर्गाच्या विविध पैलूंचे दर्शन घडविण्यात येणार आहे.
मेळ्यात एका ज्येष्ठ कर्तृत्ववान मालवणी व्यक्तीला ‘जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणखी दोन व्यक्तींना ‘मालवणी अभिमान’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
‘मालवणी अभिमान गीत’ होणार प्रकाशित
कवी महेश केळुसकर यांनी लिहिलेले आणि ‘स्वर्गापेक्षा सुंदर आसा’ फेम श्रीकृष्ण सावंत यांनी संगीतबद्ध केलेले ‘मालवणी अभिमान गीत’ यावेळी प्रकाशित करण्यात येणार आहे. एक दिवस चालणाऱ्या या भव्य मेळ्याचा समारोप मालवणी नाटकाने होणार आहे.
मालवणी भाषा, संस्कृती, लोककला, परंपरा आणि सिंधुदुर्गातील कर्तृत्वाचा अभिमान नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात येणारा हा मेळा मुंबईतील मालवणी जनतेसह सिंधुदुर्गवासीयांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.







