मालवण येथील मच्छिमार व पर्यटन व्यवसायाशी संबंधित बांधवांवर सी.आर.झेड. नियमांअंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर आज कुडाळ येथील प्रांत कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. कुडाळ–मालवणचे आमदार निलेश राणे यांनी प्रांत अधिकारी श्रीमती ऐश्वर्या काळुसे व तहसीलदार श्री. सचिन पाटील यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली.
मच्छिमार व पर्यटन व्यावसायिकांना न्याय मिळावा, त्यांच्या उपजीविकेवर परिणाम होणार नाही यासाठी योग्य तो मार्ग काढावा, अशी मागणी आमदार राणे यांनी बैठकीत केली. प्रशासनानेही संबंधित प्रकरणांचा कायदेशीर चौकटीत आढावा घेऊन सकारात्मक तोडगा काढण्याबाबत भूमिका स्पष्ट केली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष श्री. विकी तोरस्कर, जि. प. सदस्य श्री. दादा साईल, श्री. काका कुडाळकर तसेच मालवण नगरपरिषद चे नगरसेवक श्री. सहदेव बापर्डेकर, नगरसेविका सौ. चारुशीला आचरेकर, नगरसेवक श्री. महेश कोयंडे यांच्यासह अनेक मच्छिमार व पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.
बैठकीत स्थानिकांच्या भावना आणि अडचणी प्रशासनासमोर मांडण्यात आल्या असून लवकरच याबाबत पुढील कार्यवाही होणार असल्याचे सांगण्यात आले.







