Students of Varadkar High School and Junior College, Katta, were felicitated with track suits for outstanding performance at taluka, district and state-level sports competitions.
लवण | प्रतिनिधी
कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (सं.) कट्टा तसेच वराडकर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तर, जिल्हास्तर ते राज्यस्तर अशा वैयक्तिक व सांघिक क्रीडा स्पर्धांमध्ये दैदिप्यमान कामगिरी केली आहे. या यशामागे शाळेतील शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व मेहनत महत्त्वाची असल्याचे मत कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजराज वराडकर यांनी व्यक्त केले.
तालुका, जिल्हा विभाग व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना ट्रॅक सूट वितरण समारंभात बोलताना अजराज वराडकर म्हणाले की, “आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खेळाडू घडवण्याच्या दृष्टीने हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांनी मोठे ध्येय बाळगून आंतरराष्ट्रीय खेळाडू होण्याचे स्वप्न पहावे.”
या कार्यक्रमास व्यासपीठावर कट्टा पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे सचिव सुनील नाईक, सचिव सौ. विजयश्री देसाई, खजिनदार रविंद्र पावसकर, स्कूल कमिटी अध्यक्ष सुधीर वराडकर, संचालिका स्वाती वराडकर, संचालक महेश वाईरकर, आरोग्य अधिकारी गोळवण डॉ. साळकर, मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे, प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी, राकेश डगरे, गणेश वाईरकर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी विभाग, जिल्हा व राज्य पातळीवर मिळवलेल्या उल्लेखनीय यशाची दखल घेत संस्थेच्या वतीने एकूण ५० यशस्वी विद्यार्थ्यांना कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष योगात्मा डॉ. व्ही. के. ऊर्फ काकासाहेब यांच्या लोगो असलेला आकर्षक ट्रॅक सूट देऊन सन्मान करण्यात आला. तसेच या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक संजय पेंडूरकर, किसन हडलगेकर व भूषण गावडे यांनाही संस्थेच्या वतीने ट्रॅक सूट देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा प्रमुख संजय पेंडूरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राचार्य गजेंद्र मिराशी यांनी केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयक आत्मविश्वास वाढीस लागल्याची भावना पालक व शिक्षकांनी व्यक्त केली.







