मालवण | प्रतिनिधी
मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा माजी एनसीसी कॅडेट बाजीराव शंकर काळे याने समाजातील वंचित घटकांसाठी तसेच शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्रातून समाजसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या २१ तरुणांची या सत्कारासाठी निवड करण्यात आली होती. यामध्ये कोकण विभागातून केवळ तीन युवकांची निवड झाली असून, त्यात बाजीराव काळे यांचा समावेश असणे ही सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी व मालवण तालुक्यासाठी अभिमानास्पद बाब ठरली आहे.
सध्या बाजीराव काळे हे ‘अनुगामी लोकराज्य महाभियान’ अंतर्गत कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याचा आवाका व्यापक असून विविध क्षेत्रांत त्यांनी भरीव योगदान दिले आहे. ‘संविधानाची ७५ वर्षे’ या उपक्रमांतर्गत त्यांनी ५६ शाळांमधील १०,५०० विद्यार्थ्यांपर्यंत संविधानाची मूल्ये पोहोचवली असून १०० हून अधिक व्याख्याने दिली आहेत. अनाथ व एकल पालकांच्या मुलांना ‘बालसंगोपन योजना’ मिळवून देणे, तरुणांना स्वयंरोजगारासाठी शासकीय महामंडळांमार्फत कर्ज उपलब्ध करून देणे, महाकुंभ तीर्थ दर्शन तसेच ‘गुरु वंदना’ उपक्रमांद्वारे समाजात सद्भाव आणि गुरु-शिष्य नाते दृढ करण्याचे कार्यही त्यांनी केले आहे.
अत्यंत हलाखीच्या कौटुंबिक परिस्थितीतून पुढे येत मोलमजुरी करून शिक्षण पूर्ण केलेल्या बाजीराव काळे यांनी महाविद्यालयीन काळात एनसीसी विभागात ‘सीनियर’ म्हणून जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. “एनसीसीमुळेच माझ्यात नेतृत्वगुण आणि शिस्त विकसित झाली,” असे ते सांगतात.
या यशाबद्दल स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट प्रा. डॉ. एम. आर. खोत व प्रभारी प्राचार्य कैलास राबते यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच कृ. सी. देसाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष किरण ठाकूर, कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण व सर्व संचालक, पोलीस निरीक्षक मारुती जगताप, तहसीलदार गणेश लव्हे, ५८ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अजय राजशेकर, लेफ्टनंट कर्नल तनुज मंडलिक आणि सुभेदार मेजर सुधाकर कुलदीपकर यांनी बाजीराव काळे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.




