Naik brothers donated a printer to Zilla Parishad Primary School Varachi Palavwadi in Poip, Malvan, in memory of their father, supporting educational development.
पोईप | वार्ताहर
मालवण तालुक्यातील पोईप येथील वरची पालववाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस अनिल लक्ष्मण नाईक व नितीन लक्ष्मण नाईक यांनी आपले वडील कै. लक्ष्मण नाईक यांच्या स्मरणार्थ प्रिंटर भेट देत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे.
यापूर्वीही नाईक बंधूंनी पोईप वर्दम हायस्कूल तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोईप येथे संगणक व शैक्षणिक क्रीडा साहित्य भेट देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. याच उपक्रमाच्या पुढील टप्प्यात नितीन नाईक यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ या शाळेसाठी संगणक व प्रिंटर देण्याचे आश्वासन दिले आहे.
या प्रसंगी पोईप विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष शंकर (बाळा) पालव, सेवा निवृत्त शिक्षक नरेश पालव, देवस्थान मानकरी परशुराम नाईक, देऊ (बबन) नाईक, गुरुनाथ पालव, अनिल पालव, अस्मित पालव, हेमंत पालव यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
अनिल नाईक व नितीन नाईक यांच्या या आदर्श उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले. अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील शाळांच्या शैक्षणिक सुविधा सक्षम होत असून विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण साधनांचा लाभ मिळत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.







