The 45th anniversary of Ratnagiri Times Sindhudurg edition was celebrated in Malvan with the release of a special issue in the presence of dignitaries.

मालवण : (प्रतिनिधी)
दैनिक ‘रत्नागिरी टाइम्स’ सिंधुदुर्ग आवृत्तीचा ४५ वा वर्धापन दिन मालवण नगरपालिका सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, कोकण विभागाचे सहआयुक्त अरविंद नातू, मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांच्या हस्ते दैनिक ‘रत्नागिरी टाइम्स’च्या वर्धापन दिन विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी विविध नगरसेवक, अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘रत्नागिरी टाइम्स’च्या ४५ वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेण्यात आला. गेल्या चार दशकांहून अधिक काळ जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणे, प्रशासन व लोकप्रतिनिधींमध्ये सेतूची भूमिका बजावणे तसेच लोकशाही मूल्यांची जपणूक करणे, या माध्यमाच्या कार्याचा उपस्थितांनी गौरव केला. ग्रामीण व शहरी भागातील प्रश्न सातत्याने मांडून समाजप्रबोधनात ‘रत्नागिरी टाइम्स’ने दिलेल्या योगदानाचा विशेष उल्लेख करण्यात आला.

यावेळी बोलताना मान्यवरांनी मुक्त, निर्भीड व जबाबदार पत्रकारितेची आजच्या काळातील गरज अधोरेखित केली. बदलत्या माध्यमविश्वातही ‘रत्नागिरी टाइम्स’ने आपली विश्वासार्हता जपली असल्याचे नमूद करून, भविष्यातही जनतेच्या हितासाठी अशीच सकारात्मक व वास्तवदर्शी पत्रकारिता घडावी, अशा शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमास दैनिक ‘रत्नागिरी टाइम्स’चे मालवण तालुका प्रतिनिधी प्रफुल्ल देसाई, मालवण वार्ताहर भूषण मेतर, पोईप वार्ताहर संजय माने यांच्यासह तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी दैनिक ‘रत्नागिरी टाइम्स’च्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या सोहळ्यानिमित्ताने पत्रकारितेच्या माध्यमातून लोकहितासाठी सुरू असलेल्या संघर्षाची आठवण करून देत, समाजातील विविध घटकांच्या समस्या मांडण्यासाठी माध्यमांची भूमिका अधिक बळकट व्हावी, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.








