Hanumant Prabhu urges collective efforts for the growth of Gnyandeep Sanstha at Vayangani school event, featuring awards, digital classroom launch and guidance to students.
मालवण (प्रतिनिधी) :
ज्ञानदीप संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य सातत्याने सुरू असून आज ज्ञानदीप विद्यालयाचे विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करत आहेत. संस्थेतून घडलेले अनेक माजी विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत. ज्ञानदीप संस्थेची ही यशस्वी वाटचाल अशीच पुढे सुरू राहावी, सर्वांच्या सहकार्यातून संस्थेची उन्नती साधू, असे प्रतिपादन विश्वास ज्ञानदीप संस्थेचे अध्यक्ष हनुमंत प्रभू यांनी केले.
वायंगणी येथील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालयात कै. काकासाहेब आसोलकर यांचा स्मृतिदिन, संस्थेचा संकल्पदिन व प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संस्थाध्यक्ष हनुमंत प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, वायंगणी सरपंच रुपेश पाटकर, कृषी विस्तार अधिकारी व्ही. के. जाधव, पोलीस पाटील श्री. बेनाडे, शालेय समिती अध्यक्ष चंद्रकांत हडकर, मुख्याध्यापक जे. डी. टकले, संचालक सुरेश सावंत, बाळू वस्त, मनोहर वायंगणकर, माजी मुख्याध्यापक प्रकाश पेडणेकर यांच्यासह सरगुरु, आनंद कांबळी, दाजी सावंत (वनराई), श्री. तेजम, पेडणेकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक जे. डी. टकले यांनी केले.
यावेळी वनराई संस्था व एचडीएफसी बँक यांच्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या डिजिटल वर्गाचे उद्घाटन गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. तसेच वार्षिक बक्षीस वितरण समारंभात गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व वस्तूरूपात पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना संस्थाध्यक्षांनी दिलेल्या निधीतून शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. मधुसुदन वस्त चॅरिटेबल ट्रस्टतर्फे शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप बाळू वस्त यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कै. काकासाहेब आसोलकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी सरगुरु, दाजी सावंत, सुरेश सावंत, प्रकाश पेडणेकर आदींनी मार्गदर्शन केले. शालेय समिती अध्यक्ष चंद्रकांत हडकर यांनी श्री स्वामी समर्थ मठ, वायंगणी यांच्या वतीने दहावीच्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या बक्षीस रकमेमध्ये दुपटीने वाढ करण्याची घोषणा केली. विलास सावंत यांनी पाठविलेला संदेश वाचनात आला. सुरेश सावंत यांनी माजी विद्यार्थी संघटना मुंबई यांच्या वतीने सन २०२५–२६ मध्ये दहावी परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष बक्षिसांची घोषणा केली.
यावेळी मार्गदर्शन करताना गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांनी विद्यार्थ्यांनी चिकाटी, ध्येय निश्चित करून अभ्यास करावा तसेच स्पर्धा परीक्षांना सामोरे जाऊन भविष्यात तहसीलदार, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांसारख्या पदांवर कार्यरत होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
अध्यक्ष हनुमंत प्रभू यांनी शाळा इमारतीच्या दुरुस्तीसाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे, विशेषतः माजी विद्यार्थी संघटना मुंबई यांचे आभार मानले. शाळेचा सुवर्णमहोत्सव तसेच कोरोनासारख्या कठीण काळात सुंदर सावंत, सुरेश सावंत व सहकाऱ्यांनी केलेल्या सहकार्यामुळेच संस्थेची वाटचाल सशक्त राहिली, असे त्यांनी नमूद केले. सरपंच रुपेश पाटकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. जाधव यांच्यासह शिक्षक बावकर, वसावे व आडे यांनी केले.







