Women self-help groups will showcase and sell products at Anganewadi fair, organised by Sindhudurg District Bank and NABARD, inaugurating on Feb 8.
मालवण (प्रतिनिधी) :
आंगणेवाडी येथील श्री भराडी देवी यात्रेच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा बँकेशी संलग्न महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाचे प्रदर्शन व विक्री कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जत्रेच्या कालावधीत आंगणेवाडी येथे हा उपक्रम राबविण्यात येणार असून स्थानिक महिला उद्योजकांना आपले उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
या प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचा शुभारंभ दि. ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हा बँकेचे तज्ञ संचालक नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आमदार निलेश राणे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटनप्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संचालक व्हिक्टर डांटस, संदीप परब, मेघनाद धुरी, नाबार्डच्या जिल्हा प्रबंधक दीपाली माळी, सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक बाळ परब, आंगणेवाडी विकास समितीचे अध्यक्ष सतीश आंगणे, जिल्हा अभियान व्यवस्था कक्ष (उमेद) व्यवस्थापक वैभव पवार, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी नितीन काळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या प्रदर्शनात महिला बचत गटांनी तयार केलेली विविध घरगुती खाद्यपदार्थ, प्रक्रिया केलेले कृषी उत्पादने, हस्तकला वस्तू, सेंद्रिय उत्पादने तसेच ग्रामीण उद्योगाशी संबंधित माल विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. यामुळे महिला बचत गटांच्या आर्थिक सबलीकरणाला चालना मिळणार असून स्थानिक उत्पादनांना योग्य व्यासपीठ मिळणार आहे.
तरी आंगणेवाडी यात्रेला येणाऱ्या भाविकांनी व नागरिकांनी या प्रदर्शनास आवर्जून भेट देऊन महिला बचत गटांच्या उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे व संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.








