Polling will be held on Feb 7 at 111 centres in Malvan taluka for Zilla Parishad and Panchayat Samiti seats, with 74,729 voters set to cast votes.
मालवण (प्रतिनिधी) :
मालवण तालुक्यातील ६ जिल्हा परिषद आणि ११ पंचायत समिती जागांसाठी शनिवार, दि. ७ फेब्रुवारी रोजी एकूण १११ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी तालुक्यातील ७४,७२९ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून, यासाठी निवडणूक विभाग, प्रशासकीय यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावरील मतदान यंत्रे मतदान केंद्राध्यक्ष व कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देऊन पोलीस बंदोबस्तात संबंधित केंद्रांवर रवाना करण्यात आली आहेत.

मालवण तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी १३ उमेदवार तर पंचायत समिती निवडणुकीसाठी २८ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. शनिवार, दि. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार असून उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे.
या निवडणुकीसाठी तालुक्यातील ३६,६२६ पुरुष मतदार आणि ३८,१०३ महिला मतदार असे एकूण ७४,७२९ मतदार मतदान करणार आहेत. निवडणुकीची मतमोजणी सोमवार, दि. ९ फेब्रुवारी रोजी शासकीय तंत्रनिकेतन, मालवण येथे होणार आहे.
मतदान प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर शासकीय तंत्रनिकेतन, मालवण येथे निवडणूक निर्णय अधिकारी शारदा पोवार, तहसीलदार गणेश लव्हे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण व गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी सकाळी मतदान यंत्रे संबंधित मतदान केंद्रांवर रवाना करण्यात आली.
मतदान प्रक्रियेसाठी उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी शारदा पोवार यांच्या नेतृत्वाखाली मालवण तालुक्यात १२ झोनल अधिकारी आणि १११ मतदान केंद्रांवर एकूण ४४४ अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर एक मतदान केंद्राध्यक्ष व तीन कर्मचारी असे चार कर्मचारी कार्यरत राहणार असून, सुरक्षेसाठी प्रत्येक केंद्रावर एक पोलीस कर्मचारी आणि एक होमगार्ड तैनात असणार आहे.

यावेळी मालवण तालुक्यातील प्राथमिक शाळा सर्जेकोट मिर्याबांदा हे सखी मतदान केंद्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. येथे मतदान केंद्राध्यक्ष डॉ. सुमेधा नाईक यांच्यासह मतदान अधिकारी अनुष्का कदम, राधा दिघे, शुभांगी लोकरे व कर्मचारी सिमाली परब यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सखी केंद्रासाठी झोनल अधिकारी म्हणून श्वेता यादव तर क्षेत्रीय अधिकारी म्हणून मकरंद कुलकर्णी काम पाहणार आहेत.
तसेच गोळवण जि. प. शाळा क्र. २ हे मालवण तालुक्यातील आदर्श मतदान केंद्र म्हणून निश्चित करण्यात आले आहे.







