Late ITR filing despite taxpayers can claim TDS refund without penalty. Big relief for salaried employees with excess TDS deductions.
नवी दिल्ली : करदात्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत आयकर विभागाने उशिरा आयकर विवरणपत्र (ITR) भरले तरी टीडीएस (TDS) रिफंड मिळण्याची मुभा दिली आहे. आतापर्यंत अनेक करदाते अंतिम मुदतीनंतर ITR भरल्यामुळे रिफंड मिळेल की नाही, याबाबत संभ्रमात असायचे. नव्या निर्णयानुसार, केवळ रिफंड मागण्यासाठी उशिरा ITR दाखल केल्यास कोणताही अतिरिक्त दंड आकारला जाणार नाही. याचा सर्वाधिक फायदा नोकरदार कर्मचाऱ्यांना होणार आहे, कारण वेतनातून अनेकदा जादा टीडीएस कपात झालेली असते.
आयकर कायद्यानुसार करदात्यांनी ठरलेल्या मुदतीत ITR दाखल करणे आवश्यक असते. मात्र काही वेळा कागदपत्रे वेळेत न मिळणे, नोकरी बदल, फॉर्म 16 उशिरा मिळणे किंवा तांत्रिक अडचणींमुळे ITR उशिरा भरली जाते. अशा परिस्थितीत करदात्यांचा टीडीएस जास्त कापला गेला असल्यास रिफंड अडकण्याची भीती असायची. आता मात्र उशिरा फायलिंग केली तरी योग्य कागदपत्रांसह रिफंडचा दावा करता येणार आहे.
नोकरदार कर्मचाऱ्यांना कसा फायदा?
नोकरदार कर्मचाऱ्यांच्या वेतनातून टीडीएस आपोआप कपात केला जातो. अनेक वेळा गुंतवणुकीच्या पुराव्यांमुळे किंवा अंतिम गणनेनंतर प्रत्यक्ष करदेय रक्कम कमी ठरते आणि जादा कपात झालेला टीडीएस रिफंडच्या रूपात परत मिळतो. उशिरा ITR भरल्यामुळे हा रिफंड मिळणार नाही, अशी भीती आता दूर झाली आहे.
उशिरा फायलिंगवर व्याज/दंडाची स्थिती
तज्ज्ञांच्या मते, केवळ रिफंड मागण्यासाठी उशिरा ITR दाखल केल्यास दंड आकारला जाणार नसला, तरी करदेय रक्कम थकबाकी असल्यास लागू असलेले व्याज किंवा इतर दंड वेगळ्या तरतुदींनुसार लागू होऊ शकतात. त्यामुळे शक्यतो वेळेतच ITR दाखल करणे हितावह आहे.
(तज्ज्ञांचा सल्ला: रिफंड मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे (फॉर्म 16, फॉर्म 26AS, AIS) तपासून अचूक माहिती भरावी. उशिरा फायलिंग करतानाही तपशील योग्य भरल्यास रिफंड प्रक्रिया सुरळीत पार पडते.)



