नवी दिल्ली : देशातील तरुणांमध्ये आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँका आता विशेष मोहीम राबवणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना ‘Banking for Youth’ ही विशेष मोहीम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. या मोहिमेला २ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश १६ वर्षांवरील तरुणांना आर्थिक व्यवहार, बचत, बँकिंग सेवा आणि आर्थिक नियोजनाबाबत जागरूक करणे हा आहे. तरुण वयातच आर्थिक शिस्त आणि योग्य आर्थिक निर्णय घेण्याची सवय लागावी, यासाठी बँकांकडून विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.
‘बँकिंग फॉर यूथ’ मोहिमेच्या माध्यमातून तरुणांना बँक खाते, डिजिटल बँकिंग, बचत, आर्थिक नियोजन यांसह विविध बँकिंग सेवांची माहिती देण्यावर भर दिला जाणार आहे. बदलत्या डिजिटल अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित आणि जबाबदार आर्थिक व्यवहारांचे महत्त्वही तरुणांना समजावून सांगितले जाणार आहे.
विशेष म्हणजे, १६ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या तरुणांना केंद्रस्थानी ठेवून ही मोहीम आखण्यात आली आहे. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता वाढवून भविष्यातील आर्थिक निर्णय अधिक सक्षमपणे घेण्यासाठी त्यांना तयार करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.
तरुण पिढी ही देशाच्या आर्थिक विकासातील महत्त्वाची शक्ती असल्याने त्यांना लहान वयातच बँकिंग आणि आर्थिक व्यवस्थेची माहिती मिळणे आवश्यक आहे. ‘बँकिंग फॉर यूथ’ मोहिमेमुळे तरुणांमध्ये बचतीची सवय, आर्थिक नियोजन आणि डिजिटल आर्थिक व्यवहारांबाबत जागरूकता वाढण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.







