Sindhudurg ZP Election 2026: 7 February voting. Employees who are voters must get paid leave. Orders apply to private companies, hotels, shops & IT firms.
वैभववाडी, कणकवली, देवगड, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी, दोडामार्ग पंचायत समित्यांसाठी निवडणूक
खासगी आस्थापनांनाही सुट्टीचे आदेश लागू
सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी – सिंधुदुर्ग : राज्यातील १२ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत १२५ पंचायत समित्यांसाठी शनिवार, दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सार्वत्रिक निवडणूक होत असून, त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी, कणकवली, देवगड, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी आणि दोडामार्ग या पंचायत समित्यांचा समावेश आहे. या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने परिपत्रक जारी करत मतदार कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी देणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले आहे.
या आदेशानुसार, निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रातील मतदार असलेले कामगार, अधिकारी व कर्मचारी तसेच कामानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्याबाहेर कार्यरत असलेले पण मतदार म्हणून सिंधुदुर्गमध्ये नोंद असलेले कर्मचारी यांनाही मतदानासाठी भरपगारी सुट्टी देणे आवश्यक आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, गोवा किंवा इतर ठिकाणी नोकरी करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांनाही मतदानासाठी वेळ मिळणार आहे.
खासगी आस्थापनांनाही आदेश लागू
उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने, निवासी हॉटेल्स, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार व औद्योगिक उपक्रम, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग मॉल्स, रिटेल आस्थापना यांनाही हे आदेश लागू राहणार आहेत. त्यामुळे खासगी कंपन्यांमधील कर्मचारी आणि कामगारांनाही मतदानासाठी सुट्टी देणे बंधनकारक आहे.
अत्यावश्यक सेवांसाठी विशेष सवलत
अपवादात्मक परिस्थितीत, ज्या लोकोपयोगी किंवा अत्यावश्यक सेवांमध्ये पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नाही, अशा ठिकाणी संबंधित आस्थापना मालकांनी कर्मचाऱ्यांना मतदानासाठी दोन ते तीन तासांची विशेष सवलत देणे आवश्यक आहे. ही सवलत प्रत्यक्षात मिळते आहे की नाही, याची जबाबदारी संबंधित मालकांवर राहणार असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
लोकशाहीच्या प्रक्रियेत सहभागाचे आवाहन
जिल्हा प्रशासन व निवडणूक यंत्रणेने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व मतदारांना मतदानासाठी आवर्जून बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून ग्रामीण विकासाचा आराखडा ठरवला जात असल्याने प्रत्येक मत महत्त्वाचे असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी, कणकवली, देवगड, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी, दोडामार्ग या सर्व पंचायत समित्यांसाठी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे.








