● 40 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाला गती
● भूसंपादनाला लवकरच सुरुवात
Kolhapur–Vaibhavwadi Railway Line work to begin in 2027. West Maharashtra to get direct rail connectivity with Konkan Railway. Full project details.
वैभववाडी : पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण रेल्वेने जोडण्याचे अनेक दशकांपासूनचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे. कोल्हापूर–वैभववाडी रेल्वे मार्गाच्या कामाला 2027 पासून सुरुवात होणार असून, केंद्रीय अर्थसंकल्पातून या प्रकल्पासाठी मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्राला रेल्वे विकासासाठी मिळणाऱ्या सुमारे 30 हजार कोटी रुपयांपैकी 3 हजार 411 कोटी रुपये या प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून देण्यात येणार आहेत. राज्य शासनाचाही हिस्सा तत्काळ उपलब्ध करून दिला जाणार असल्याने भूसंपादन प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.
कोल्हापूर कोकण रेल्वेला जोडण्याची मागणी गेल्या 40 वर्षांपासून प्रलंबित होती. 25 फेब्रुवारी 2016 रोजी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या मार्गाला मंजुरी देत निधीची तरतूद केली होती. केंद्र व राज्य शासनाच्या 50:50 भागीदारीतून हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. सर्व्हेक्षण, डीपीआर आणि केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळूनही प्रत्यक्ष काम सुरू होण्यास जवळपास पावणेदहा वर्षांचा कालावधी गेला.
2016 साली या प्रकल्पाचा अंदाजित खर्च 3,244 कोटी रुपये होता. मात्र, विलंब आणि वाढलेल्या खर्चामुळे आता हा खर्च सुमारे 6,300 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. केंद्र शासन 3,411 कोटी रुपये तर राज्य शासन सुमारे 2,889 कोटी रुपयांचा निधी देणार आहे.
या रेल्वे मार्गासाठी एकूण 638.6 हेक्टर जमीन संपादित केली जाणार असून त्यासाठी सुमारे 1,200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हानिहाय भूसंपादन प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार आहे.
हा रेल्वेमार्ग करवीर, पन्हाळा, गगनबावडा आणि वैभववाडी तालुक्यांतून जाणार आहे. प्रकल्पांतर्गत 27 बोगदे (एकूण 28 किमी), 55 उड्डाणपूल, 68 अंडरपास पूल, 74 छोटे व 55 मोठे पूल प्रस्तावित आहेत. या मार्गावर एकूण दहा स्थानके उभारण्यात येणार आहेत.
या प्रकल्पामुळे कोल्हापूर ते कोकण प्रवास अधिक जलद व सुलभ होणार असून पर्यटन, व्यापार आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.








