कणकवली : (प्रतिनिधी)
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी कामगिरी कोकणकन्या सावी मुद्राळे हिने केली आहे. कासार्डे माध्यमिक विद्यालय, कणकवली येथील इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी सावी मुद्राळे हिची केंद्र सरकारच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘प्रोजेक्ट वीर गाथा ५.०’ या उपक्रमात राष्ट्रीय स्तरावर निवड झाली असून, तिचा दिल्लीत गौरव करण्यात आला. कणकवली ते दिल्ली असा तिचा प्रेरणादायी प्रवास आज संपूर्ण कोकणासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.
देशाच्या शौर्यगाथा आणि वीर जवानांच्या बलिदानावर आधारित सर्जनशील सादरीकरणासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘प्रोजेक्ट वीर गाथा’ या स्पर्धेत देशभरातील हजारो विद्यार्थ्यांतून सावीची निवड झाली. आपल्या कल्पकतेने, लेखनकौशल्याने आणि अभ्यासपूर्ण मांडणीने सावीने परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. कोकणातील छोट्या गावातून राष्ट्रीय व्यासपीठापर्यंत पोहोचलेली ही अष्टपैलू विद्यार्थिनी अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.
दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमात सावीचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सावीच्या यशाबद्दल तिचे शिक्षक, शाळा प्रशासन, पालक तसेच परिसरातील नागरिकांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. सावीच्या या यशामुळे कासार्डे माध्यमिक विद्यालयासह संपूर्ण कणकवली तालुक्याचा नावलौकिक वाढला आहे.
लहान वयातच राष्ट्रीय स्तरावर मिळवलेला हा सन्मान सावीच्या मेहनतीचे, चिकाटीचे आणि बहुआयामी गुणवत्तेचे प्रतीक आहे. कोकणच्या मातीतील ही लेक भविष्यात आणखी मोठी उंची गाठेल, असा विश्वास तिच्या यशाकडे पाहून व्यक्त केला जात आहे.







