मुंबई | प्रतिनिधी —
कोकणच्या मातीने घडवलेल्या शौर्य, निष्ठा आणि बलिदानाच्या गाथा पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर जिवंत होणार आहेत. ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’च्या यशानंतर तब्बल सहा वर्षांनी अजय देवगणने तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित नव्या चित्रपटाची घोषणा करत प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेची लाट निर्माण केली आहे. या नव्या चित्रपटाचे नाव ‘बाल तानाजी’ असून, हा भारतातील पहिलाच एआय ओरिजिनल ऐतिहासिक चित्रपट असणार आहे.
या वेळी तलवार हातात घेतलेला पराक्रमी योद्धा नव्हे, तर एका छोट्या कोकणी गावात जन्मलेला, स्वप्न पाहणारा आणि ध्येयासाठी झुंजणारा तानाजी प्रेक्षकांसमोर येणार आहे. ‘बाल तानाजी’मध्ये तानाजी मालुसरे यांच्या बालपणापासून ते योद्धा घडण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास उलगडण्यात येणार आहे. शौर्य, संस्कार आणि स्वराज्यनिष्ठा या मूल्यांची पायाभरणी कशी झाली, यावर चित्रपटाचा भर असणार आहे.
अजय देवगणने नुकताच या चित्रपटाचा ‘फर्स्ट लुक’ सोशल मीडियावर शेअर केला असून, त्यात बाल तानाजींच्या डोळ्यांतील तेज आणि हातात धरलेली तलवार प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. आधुनिक एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने इतिहास नव्या पद्धतीने मांडण्याचा हा प्रयत्न भारतीय चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड ठरेल, असे मानले जात आहे.
लेन्स वॉल्ट स्टुडिओज’अंतर्गत अजय देवगण आणि दानिश देवगण यांनी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारला आहे. यावेळी अजय देवगण म्हणतो, “आपल्या इतिहासातील महान योद्ध्यांच्या कथा नव्या पिढीपर्यंत पोहोचायला हव्यात. ‘बाल तानाजी’ हा इतिहास आणि तंत्रज्ञान यांचा संगम आहे.”
राष्ट्रीय पुरस्काराने गौरवलेल्या ‘तानाजी’नंतर आता ‘बाल तानाजी’कडून अपेक्षा अधिकच वाढल्या आहेत. कोकणच्या मातीतून उगवलेला सुपुत्रयोद्धा पुन्हा एकदा देशभरातील प्रेक्षकांच्या मनात स्वराज्याची ज्वाला पेटवणार, अशी भावना व्यक्त केली जात आहे.



