मालवणी संस्कृती आणि विनोदाची परंपरा जपत आई केळबाई जत्रोत्सवानिमित्त वायरी (ता. मालवण) येथे भव्य जिल्हास्तरीय ‘हास्य धमाका’ कॉमेडी स्किट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २५ मार्च २०२६ रोजी श्री केळबाई मंदिर, वायरी येथे पार पडणार आहे.
या स्पर्धेत मालवणी बोलीतील विनोदी स्किट सादर करणाऱ्या संघांना सहभागी होता येणार असून प्रत्येक स्किटसाठी १५ ते २० मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे. एका संघात किमान ४ किंवा त्यापेक्षा अधिक कलाकार असणे आवश्यक आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनी रात्री ९ वाजता वेळेत उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
स्पर्धेत विजेत्या संघांना आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत. प्रथम पारितोषिक १५,००१ रुपये, द्वितीय पारितोषिक १०,००१ रुपये आणि तृतीय पारितोषिक ७,००१ रुपये तसेच आकर्षक चषक देण्यात येणार आहेत. याशिवाय प्रत्येक सहभागी संघाला ‘सन्मानचिन्ह’ देऊन गौरविण्यात येणार आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रथम नोंदणी करणाऱ्या १० संघांना प्राधान्य देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी ९८९०४२८८३१, ९८६०७११६२९ आणि ९४२३२१५४४४ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या भव्य विनोदी स्पर्धेमुळे मालवणी कला, संस्कृती आणि स्थानिक कलाकारांना एक व्यासपीठ मिळणार असल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण आहे.






