आपल्या मखमली आवाजाने आणि वेदनेलाही सुरेल करणाऱ्या गायकीने गेल्या दशकाहून अधिक काळ कोट्यवधी श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा प्रसिद्ध गायक अरिजित सिंग याने चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. ‘तुम ही हो’पासून सुरू झालेला त्याचा यशस्वी संगीतप्रवास आता एका महत्त्वाच्या वळणावर थांबला असून अरिजित सिंगने पार्श्वगायनातून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच घेतलेल्या या निर्णयामुळे संपूर्ण संगीतविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अरिजित सिंगने ही माहिती आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चाहत्यांशी संवाद साधताना दिली. आपल्या पोस्टमध्ये तो म्हणतो, “नमस्कार आणि सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. गेल्या अनेक वर्षांत श्रोते म्हणून तुम्ही मला जे अमाप प्रेम दिले, त्याबद्दल मी मनापासून ऋणी आहे. आज मी एक महत्त्वाचा निर्णय तुमच्यासमोर मांडत आहे. यापुढे मी पार्श्वगायक म्हणून कोणतीही नवीन कामे स्वीकारणार नाही. हा प्रवास इथेच थांबवत आहे.”
अरिजितने आपल्या भावना व्यक्त करताना हा प्रवास विलक्षण, संस्मरणीय आणि आयुष्यभर लक्षात राहणारा असल्याचे सांगितले. त्याच्या या घोषणेमुळे चाहते निराश झाले असले, तरी त्याने एक आशेचा किरणही दाखवून दिला आहे. चित्रपटांसाठी गाणे थांबवत असला तरी तो संगीत निर्मितीपासून दूर जाणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले.
“माझ्याकडे काही जुनी वचनबद्ध कामे अजून पूर्ण करायची आहेत. त्यामुळे या वर्षात माझी काही गाणी प्रदर्शित होतील. मात्र एक गोष्ट ठामपणे सांगतो की, मी संगीत बनवणे कधीही थांबवणार नाही,” असेही अरिजित सिंगने नमूद केले.
अरिजित सिंगच्या या निर्णयामुळे बॉलिवूड संगीतसृष्टीत एक युग संपल्याची भावना व्यक्त केली जात असून त्याच्या आवाजाने सजलेल्या असंख्य अजरामर गीतांचा वारसा मात्र कायम राहणार आहे.





