३१ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन
पात्र कलाकार-साहित्यिकांनी लाभ घ्यावा
राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेंतर्गत लाभ मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १ जुलै २०२६ पासून सुरू झाली असून, पात्र साहित्यिक व कलाकारांनी ३१ जुलै २०२६ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
या योजनेसाठी अर्ज ‘आपले सरकार’ पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक असून त्याचे वय ५० वर्षांपेक्षा अधिक असावे. दिव्यांग कलाकारांसाठी वयोमर्यादेत १० वर्षांची शिथिलता देण्यात आली असून त्यांच्यासाठी किमान वय ४० वर्षे निश्चित करण्यात आले आहे.
अर्जदाराचे कला किंवा साहित्य क्षेत्रातील किमान १५ वर्षांचे सातत्यपूर्ण, दर्जेदार व उल्लेखनीय योगदान असणे आवश्यक आहे. तसेच कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळून वार्षिक उत्पन्न ६० हजार रुपयांपेक्षा अधिक नसावे. ज्यांची उपजीविका केवळ कलेवर अवलंबून आहे किंवा पूर्वी कलेवर अवलंबून होती, मात्र सध्या इतर कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही, अशा कलाकारांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. मात्र केंद्र किंवा राज्य शासनाच्या नियमित मासिक पेन्शन योजनेचा लाभ घेणारे कलाकार या योजनेसाठी अपात्र राहतील.
निवड प्रक्रियेत वयोवृद्ध, विधवा, परित्यक्ता तसेच दिव्यांग कलाकारांना प्राधान्य दिले जाणार आहे.
ऑनलाइन अर्जासोबत वयाचा दाखला, ओळखपत्र, रहिवासी व उत्पन्नाचा दाखला, प्रतिज्ञापत्र, बँक खाते व आयएफएससी कोडची माहिती, तसेच आवश्यकतेनुसार पती-पत्नीचा संयुक्त फोटो जोडणे बंधनकारक आहे. दिव्यांग असल्यास अपंगत्वाचा दाखला, राज्य किंवा केंद्र शासनाचे पुरस्कार प्राप्त झाल्याची प्रमाणपत्रे, नामांकित संस्था किंवा व्यक्तींची शिफारसपत्रे आणि इतर संबंधित कागदपत्रेही सादर करावी लागणार आहेत.
दरम्यान, या योजनेची माहिती सर्व ग्रामपंचायतींपर्यंत पोहोचवून गावपातळीवर व्यापक प्रसिद्धी करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत, जेणेकरून अधिकाधिक पात्र साहित्यिक व कलाकारांना या योजनेचा लाभ मिळू शकेल.






