शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी), पुणे तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक व अधिकारी यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेत वराडकर हायस्कूल, कट्टा प्रशालेतील कलाशिक्षक श्री. समीर चांदरकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
‘डिजिटल शिक्षण’ या विषयावर साकारण्यात आलेल्या त्यांच्या रांगोळीने परीक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले असून, या कलाकृतीला राज्यस्तरावर सर्वोच्च मानांकन मिळाले आहे. या यशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कला व शिक्षण क्षेत्राचा राज्यपातळीवर गौरव झाला आहे.
शिक्षक व अधिकारी यांच्यासाठी आयोजित या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध विभागांतील स्पर्धक सहभागी झाले होते. अत्यंत मर्यादित वेळेत आणि ठरावीक चौकटीत रांगोळी साकारण्याचे आव्हान असतानाही समीर चांदरकर यांनी आपल्या कौशल्याचा ठसा उमटवत हे यश संपादन केले.
या स्पर्धेतील त्यांच्या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, कला व शिक्षण क्षेत्रात कार्यरत शिक्षकांसाठी हे यश प्रेरणादायी ठरत आहे.





