सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होताच महायुतीतील अंतर्गत नाराजी उघडपणे समोर येऊ लागली आहे. माजी केंद्रीय मंत्री व खासदार नारायण राणे यांनी महायुतीची अधिकृत घोषणा केल्यानंतर अवघ्या काही तासांतच भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला. मात्र या घोषणेनंतर जिल्ह्यात विशेषतः भाजप आणि शिंदे गटात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून, राजीनाम्यांचे नाट्य सुरू झाले आहे.
शिवसेना (शिंदे गट) ओबीसी सेलच्या जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांतील जागावाटप मान्य नसल्याने तसेच पक्षात काम करताना घुसमट होत असल्याचा आरोप करत त्यांनी पक्षत्यागाचा निर्णय घेतला आहे.
पिंगुळी आणि तेंडोली हे शिवसेनेचे पारंपरिक बालेकिल्ले असतानाही त्या भागांतील जागांच्या तिकीट वाटपात आपल्याला डावलण्यात आल्याचा आरोप कुडाळकर यांनी केला आहे. पक्षासाठी सातत्याने काम करूनही योग्य सन्मान आणि विचार न झाल्याने हा निर्णय घ्यावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
“पक्षात काम करताना स्वाभिमान दुखावला जात होता. निर्णयप्रक्रियेत स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नाही. अशा परिस्थितीत पक्षात राहणे कठीण झाले होते,” असे त्यांनी सांगितले.आपण स्वाभिमानी असल्याने हा निर्णय घेतला असून, पुढील राजकीय भूमिका लवकरच जाहीर करणार असल्याचेही वर्षा कुडाळकर यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान महातीचा फॉर्म्युला जाहीर होताच भाजपच्या गोटात रविवारपासूनच याचे पडसाद उमटायला सुरुवात झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस मंडळ अध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या राजीनाम्यात त्यांनी, “सध्याच्या राजकीय परिस्थितीत या पदावर राहून काम करणे मला उचित वाटत नाही. कोणत्याही नेत्याविरोधात वैयक्तिक नाराजी नाही, तरी माझा राजीनामा तात्काळ स्वीकारण्यात यावा,” असे नमूद केले आहे. हा राजीनामा त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्याकडे सादर केल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
आनंद उर्फ भाई सावंत यांच्या राजीनाम्यानंतर ओरोस मंडळात असंतोष अधिकच तीव्र झाल्याचे चित्र आहे. ओबीसी जिल्हाध्यक्ष महेश उर्फ छोटू पारकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य लॉरेन्स मान्येकर, उदयकुमार जांभवडेकर, ओरोस मंडळ उपाध्यक्ष आबा मुंज, जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष जयेश चिंचळकर, अनुसूचित जाती मोर्चा मंडळ अध्यक्ष सुनील जाधव यांच्यासह बूथ अध्यक्ष, शक्तिकेंद्र प्रमुख अशा एकूण ४३ पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिल्याची माहिती समोर आली आहे.
महायुतीच्या जागावाटपावरून निर्माण झालेल्या या असंतोषामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीसमोरील आव्हाने वाढल्याचे चित्र आहे. पुढील काळात आणखी राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





