मालवण | प्रतिनिधी
देशाचे सुजाण नागरिक घडवण्यात राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.)ची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. एन.एस.एस.च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त, श्रमसंस्कार, परस्पर आदर, सहकार्याची भावना तसेच समाजातील तळागाळातील घटकांच्या समस्या आणि त्यावरील उपाययोजनांची जाणीव निर्माण होते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास घडवून त्यांना जबाबदार नागरिक बनवण्याचे महत्त्वाचे कार्य एन.एस.एस. करते, असे प्रतिपादन कृ.सी. देसाई शिक्षण मंडळ, मालवणचे कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण यांनी केले.
साळेल येथे मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या वतीने आयोजित सात दिवसीय निवासी श्रमसंस्कार शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर साळेल गावचे सरपंच रवींद्र गावडे, उपसरपंच लक्ष्मण परब, प्रभारी प्राचार्य प्रा. कैलास राबते, संचालक संदेश कोयंडे, एन.एस.एस. समन्वयक डॉ. देविदास हारगिले, ग्रामसेविका स्वरा परब, पोलिस पाटील रवींद्र गावडे, ग्रामपंचायत सदस्य शिल्पा गावडे व संपदा गावडे उपस्थित होते.
प्रारंभी एन.एस.एस. समन्वयक डॉ. देविदास हारगिले यांनी शिबिराचे प्रास्ताविक केले. यावेळी साईनाथ चव्हाण यांनी आपल्या विद्यार्थी दशेतील एन.एस.एस.चे अनुभव कथन करत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. सरपंच रवींद्र गावडे यांनी विद्यार्थ्यांना शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या.
माजी पंचायत समिती सदस्य कमलाकर गावडे यांनी, आयुष्यात सर्व गोष्टी मनासारख्या मिळतीलच असे नाही, मात्र त्या परिस्थितीतून मार्ग काढून पुढे जाण्याची शिकवण एन.एस.एस. देते, असे सांगून विद्यार्थ्यांनी या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन केले. प्रभारी प्राचार्य प्रा. कैलास राबते यांनी एन.एस.एस.च्या माध्यमातून स्वतःचा सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहन करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास प्रा. डॉ. उज्ज्वला सामंत, डॉ. हंबीरराव चौगले, प्रा. डॉ. एम. आर. खोत, प्रा. एस. पी. खोबरे, प्रा. संग्रामसिंह पवार, प्रा. अन्वेषा कदम, प्रा. हसन खान, प्रा. रोहिणी फाटक, प्रा. रामचंद्र तावडे, सूर्यकांत कदम, महाविद्यालयाचा विद्यार्थी सचिव सर्वेश राणे, उद्योजक अरविंद तावडे, वसंत पडवळ तसेच ग्रामस्थ भानजी गावडे, विवेकानंद पेडणेकर, गणेश गावडे, संतोष गावडे यांच्यासह नरेश गावडे, राजाराम गावडे, मुरारी गावडे, रोशन गावडे, वैभव गावडे, चिन्मय तावडे व ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रमोद खरात यांनी केले तर आभार प्रा. डॉ. संकेत बेळेकर यांनी मानले.







