मालवण | प्रतिनिधी
सूर्याच्या उत्तरायणाचा प्रारंभ या भौगोलिक घटनेच्या निमित्ताने जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा आडवली नं. १ येथे गणितीय पतंग महोत्सव हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी पतंग उडविण्याचा मनमुराद आनंद घेत गणितातील चौरस, लांबी-रुंदीचे मापन, परिमिती, क्षेत्रफळ तसेच काटकोन त्रिकोणाचे गुणधर्म प्रत्यक्ष अनुभवातून अभ्यासले.
गणित विषयातील निरसता कमी करून क्लिष्ट संकल्पना रंजक व सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना आत्मसात करता याव्यात, या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील ही शाळा सातत्याने नावीन्यपूर्ण व उपक्रमशील शिक्षण पद्धती राबवित असल्याचे या उपक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
अनुभूतीयुक्त शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासावर सकारात्मक परिणाम होतो, या संकल्पनेतून या गणितीय पतंग महोत्सवाची आखणी करण्यात आली. पतंगाच्या आकार, कोन, दोराची लांबी, क्षेत्रफळ यांचे प्रत्यक्ष मापन करत विद्यार्थ्यांनी गणित शिकण्याचा आनंददायी अनुभव घेतला.
या उपक्रमाचे यशस्वी आयोजन शाळेतील शिक्षक श्रीम. तनुजा तांबे, श्रीम. रागिणी ठाकूर, श्रीम. वेदिका वाघाटे आणि श्री. रामचंद्र कुबल यांनी केले. या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे शैक्षणिक क्षेत्रातून विशेष कौतुक होत आहे.







