मालवण (प्रतिनिधी) :
“नाही पुस्तक… नाही शाळा… निसर्गाच्या सानिध्यात मनसोक्त खेळा…” या संकल्पनेतून केंद्र शाळा आचरे नं. १ च्या विद्यार्थ्यांनी तोंडवळी येथील रमणीय समुद्रकिनारी एक दिवस आनंदात आणि उत्साहात घालवला. निसर्गाशी नाते जपण्याचा आणि त्यातून शिकण्याचा हा अनुभव विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला.
विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासोबतच अवांतर ज्ञानवृद्धी व्हावी, निसर्गाविषयी आपुलकी निर्माण व्हावी, या उद्देशाने शाळेच्यावतीने वनभोजन सहलीचे आयोजन करण्यात आले होते. समुद्रकिनारी खेळ, निरीक्षण, गप्पा आणि निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत विद्यार्थ्यांनी आनंददायी क्षण अनुभवले.
या उपक्रमास आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी, ग्रामपंचायत सदस्य पंकज आचरेकर, उद्योजक महेश राणे, अजित घाडी आदी मान्यवरांनी भेट देत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जयप्रकाश परुळेकर व उपाध्यक्ष श्रीमती दिपाली जितेंद्र कांबळी यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
या सहलीत शाळा व्यवस्थापन समिती सदस्य विष्णु भाटकर, संदीप पांगम, संतोष मेस्त्री, विलास आचरेकर, अर्पिता घाडी, सुजाता कामतेकर, प्राजक्ता घारे, अनिता पाटील, सिद्धेश हळवे यांच्यासह सर्व सदस्य, पालक व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम शिक्षणासोबत निसर्गाशी मैत्री घडविणारा ठरला, अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.







