मालवण (प्रतिनिधी) :मालवण तालुक्यातील मसुरे मार्गाचीतड येथील श्री महागणपती मंदिरात दि. २१ व २२ जानेवारी रोजी श्री महागणपती विश्वस्त मंडळाच्यावतीने माघी श्री गणेश जयंती उत्सव भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे.
उत्सवानिमित्त बुधवार, दि. २१ जानेवारी रोजी सकाळी ८.३० ते ९.०० या वेळेत सहस्रनाम जप सोहळा, सकाळी ९.३० ते दुपारी १२.०० या वेळेत सामुदायिक एकादशी सोहळा होणार आहे. (एकादशी करण्याची इच्छा असलेल्या भाविकांनी ९४२११४५८२८ या क्रमांकावर संपर्क साधावा.) दुपारी १२.३० नंतर महाआरती व तीर्थप्रसाद होईल.
सायंकाळी ६.३० ते ७.३० हरिपाठ, ७.३० ते रात्री ८.३० या वेळेत ‘मन हे मोगरा अर्पणी ईश्वरा’ या ओवीवर आधारित ह.भ.प. जगन्नाथ रामचंद्र मोहिते यांचे प्रवचन होणार असून ८.३० ते ९.०० या वेळेत वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार, दि. २२ जानेवारी रोजी सकाळी ८.०० ते ९.०० श्री महागणपती पूजा व अभिषेक, ९.०० ते दुपारी १२.३० श्री सत्यनारायण महापूजा, १२.३० ते १.०० महाआरती व तीर्थप्रसाद, १.०० ते ३.०० महाप्रसाद, तर ३.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ होणार आहे.
सायंकाळी ७.०० वाजता श्री महागणपती प्रासादिक भजन मंडळ, मसुरे–मार्गाचीतड यांचे सुश्राव्य भजन (बुवा – अमित बागवे) होईल. रात्री ९.३० वाजता बाळा सावंत दशावतार नाट्यमंडळ, नेरूर-असरोली यांचे मिनी ट्रिक्सीनयुक्त, आध्यात्मिक सत्यनारायण कथेवर आधारित दशावतारी नाट्य ‘श्री देव सत्यनारायण’ सादर करण्यात येणार आहे.
या सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री महागणपती विश्वस्त मंडळ, मसुरे मार्गाचीतड यांच्यावतीने करण्यात आले आहे.







