देवबाग : मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत ६५ वर्षे पूर्ण झालेल्या जेष्ठ नागरिकांना राज्य शासनाकडून देण्यात येणारी त्यांच्या हक्काची रुपये ३,०००/- (एकरकमी) आर्थिक सहाय्याची रक्कम अद्याप मिळालेली नाही. या योजनेअंतर्गत लाभ मिळण्याची अपेक्षा असताना एक वर्ष उलटूनही अनेक जेष्ठ नागरिकांना मानधन मिळालेले नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या संदर्भात ग्रामपंचायत सदस्य श्री. पास्कोल रिटा अंतोन रॉड्रीग्ज यांनी शासनाचे लक्ष वेधत सांगितले की, जेष्ठ नागरिकांनी वेळेत अर्ज करूनही आणि सर्व कागदपत्रे सादर करूनही लाभ न मिळणे ही गंभीर बाब आहे. वयोवृद्ध अवस्थेत दैनंदिन गरजांसाठी या रकमेवर अवलंबून असलेल्या नागरिकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
“येत्या १५ दिवसांच्या आत जेष्ठ नागरिकांना न्याय मिळाला नाही, तर सर्व लाभार्थी जेष्ठ नागरिकांना विश्वासात घेऊन घरोघरी सह्यांची मोहीम राबवण्यात येईल आणि ही मागणी शासनापर्यंत ठामपणे पोहोचवली जाईल,” असा इशारा श्री. रॉड्रीग्ज यांनी दिला आहे.
राज्य शासनाने तातडीने हस्तक्षेप करून मुख्यमंत्री वयोश्री योजनेतील प्रलंबित लाभ त्वरित वितरित करावेत, अन्यथा जेष्ठ नागरिकांच्या संयमाचा अंत होईल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.



