मालवण | प्रतिनिधी
बुधवळे–कुडोपी ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेल्या चिरेखाण व्यवसायातील कामगारांसाठी शौचालयाची कोणतीही व्यवस्था नसल्याने उघड्यावर शौचास जाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. याबाबत संबंधित खाण मालकांना वारंवार सूचना देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर तातडीने शौचालय व्यवस्था करण्यात यावी, अन्यथा १२ जानेवारीपासून मालवण तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा बुधवळे–कुडोपी ग्रामपंचायतीतर्फे मालवण तहसीलदारांना लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की बुधवळे–कुडोपी गाव हे डोंगर उतारावर व खोलगट भागात वसलेले असून, डोंगरावरून वाहणाऱ्या नैसर्गिक झऱ्यांचे पाणी ग्रामस्थ पिण्यासाठी वापरतात. मात्र खाण कामगारांकडून उघड्यावर शौचालय केल्यामुळे हे सांडपाणी नैसर्गिक झऱ्यांमध्ये मिसळत असून पिण्याचे पाणी दूषित होत आहे. त्यामुळे गावात रोगराई पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे बुधवळे–कुडोपी गावाला २००८-०९ मध्ये हागणदारीमुक्त गाव म्हणून घोषित करण्यात आले होते. असे असतानाही चिरेखाण मालकांकडून कामगारांसाठी शौचालयाची व्यवस्था न करणे ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे. वेळोवेळी सूचना देऊनही खाण मालकांकडून दुर्लक्ष होत असल्याने आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तहसील प्रशासनाने तातडीने लक्ष घालून खाण मालकांना कामगारांसाठी योग्य व पुरेशी शौचालय व्यवस्था करण्याचे आदेश द्यावेत, अन्यथा ग्रामस्थ व ग्रामपंचायत संयुक्तपणे उपोषणाला बसतील, असा ठाम इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.



