धामापूर : कधी पावसात चिखल, कधी उन्हात धूळ… आणि दरवेळी प्रवासात अडचण. धामापूर तलावाच्या काठाने मोगरणेवाडी आणि फोपळेवाडीला जोडणारा रस्ता हा गेली तब्बल २९ वर्षे केवळ आश्वासनांचा आणि प्रतीक्षेचा विषय ठरला होता. मात्र जिथे विषय जनतेच्या अडचणींचा असतो, तिथे आमदार निलेश राणे थांबत नाहीत, याचा प्रत्यय अखेर धामापूरवासीयांना आला.
सन १९९७ मध्ये माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार यांच्या माध्यमातून हा रस्ता प्रथम बांधण्यात आला. मात्र या रस्त्याचा सुमारे ९०० मीटर भाग संरक्षित वनविभागाच्या क्षेत्रातून जात असल्याने, पुढील अनेक वर्षे हा रस्ता ‘अर्धवट’ अवस्थेतच राहिला. उर्वरित भागाची डागडुजी होत राहिली, पण वनहद्दीतील भागाला परवानगीअभावी हातही लावता आला नाही. परिणामी काळाच्या ओघात हा रस्ता प्रवासासाठी धोकादायक ठरू लागला.
या रस्त्याशिवाय मोगरणेवाडी, फोपळेवाडी व परिसरातील नागरिकांसमोर दुसरा कोणताही पर्याय नव्हता. ग्रामपंचायत कामकाज असो, बाजारपेठ असो, रुग्णालयात जाण्याची गरज असो किंवा विद्यार्थ्यांचा शाळेचा प्रवास.. सर्व काही याच रस्त्यावर अवलंबून होते. त्यामुळे “हा रस्ता कधी नीट होणार?” हा प्रश्न पिढ्यान्पिढ्या विचारला जात होता.
दरम्यान, धामापूर ग्रामपंचायतच्या सरपंच मानसी परब, सर्व सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते महेश परब यांनी हा प्रश्न सातत्याने पाठपुराव्यात ठेवला. त्यांच्या प्रयत्नांना बळ दिले शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणि आमदार निलेश राणे यांनी. अनेकांना अशक्य वाटणारी वनविभागाची परवानगी अखेर मिळवून दाखवत आमदार निलेश राणे यांनी या प्रश्नावर निर्णायक तोडगा काढला.
या रस्त्याच्या ९०० मीटर भागाच्या डागडुजीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून १६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, वनविभागाच्या माध्यमातून रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे. या प्रक्रियेत स्यमंतक संस्थेचे सचिन देसाई यांचेही सहकार्य लाभले असल्याची माहिती सरपंच मानसी परब यांनी दिली.
तब्बल २९ वर्षांनंतर या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ रविवार, दि. ४ जानेवारी रोजी माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष साटविलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. सरपंच मानसी परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामाची सुरुवात करण्यात आली. यावेळी वनक्षेत्रपाल संदीप कुंभार, वनपाल सदानंद परब, वनरक्षक, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
वनविभाग हद्दीतील हा रस्ता मुरूम, दगड व मातीचा वापर करून सपाटीकरण व मजबुतीकरण पद्धतीने तयार केला जाणार असल्याचे वनक्षेत्रपाल संदीप कुंभार यांनी स्पष्ट केले.
२९ वर्षांचा रखडलेला प्रश्न, एक ठोस निर्णय आणि लोकप्रतिनिधीची वचनपूर्ती
धामापूर–मोगरणे रस्त्याने अखेर ‘अडचणींच्या वाटेवरून दिलाशाच्या मार्गाकडे’ वाटचाल सुरू केली आहे.





