Online applications for 25% RTE admissions in self-financed and unaided schools begin from 17 February in Sindhudurg. BARTI provides free assistance for filling RTE forms for eligible students from weaker and disadvantaged sections.
मालवण (वार्ताहर)
मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्याअंतर्गत (RTE) दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी स्वयंअर्थसहायित व विनाअनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिलीसाठी २५ टक्के राखीव प्रवेश प्रक्रियेला १७ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १० मार्च आहे.
Right of Children to Free and Compulsory Education Act, 2009 अंतर्गत पालकांनी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक आहे. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक राहील. पालकांच्या निवासस्थानापासून एक किमीपेक्षा कमी अंतरावरील शाळांची माहिती अधिकृत RTE संकेतस्थळावर उपलब्ध होणार असून त्यापैकी शाळांची निवड करावी लागेल.
कोण पात्र?
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्ग, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास घटक, एचआयव्ही बाधित/प्रभावित बालके, अनाथ, दिव्यांग तसेच कोविड प्रभावित बालकांचा वंचित घटकात समावेश होतो. तसेच वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या कुटुंबांतील बालकांचा आर्थिक दुर्बल घटकात समावेश करण्यात येतो.
बार्टीकडून मोफत फॉर्म भरण्याची सुविधा
सामाजिक न्याय विभागाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या वतीने RTE प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज मोफत भरून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ही सेवा विनामूल्य दिली जाणार आहे.
ज्या पालकांना अर्ज विनामूल्य भरायचा आहे त्यांनी संबंधित तालुक्यातील समतादूतांशी संपर्क साधावा, असे आवाहन बार्टीचे महासंचालक सुनील वारे, विभाग प्रमुख डॉ. बबन जोगदंड आणि विभागीय प्रकल्प अधिकारी तेजस्विनी सोनवणे यांनी केले आहे. RTE प्रवेश प्रक्रियेचा लाभ जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.







