मुंबई : प्रतिनिधी
कोकणवासीयांची बहुप्रतीक्षित मुंबई-सावंतवाडी एक्स्प्रेस अखेर सेवेत दाखल झाली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक १८ वर आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून एक्स्प्रेस रवाना करण्यात आली. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल दूरदृश्यसंवाद प्रणालीद्वारे कार्यक्रमाला उपस्थित होते.यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कोकणच्या विकासाला मिळणार नवी गती
मुंबई आणि कोकणातील रेल्वे जोडणी अधिक सक्षम करणारी ही दैनंदिन सेवा ठरणार आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील नागरिकांसाठी सुरक्षित, सुलभ आणि विश्वासार्ह प्रवासाची सुविधा या एक्स्प्रेसमुळे उपलब्ध होणार आहे. या सेवेमुळे कोकणातील पर्यटन, व्यापार, हॉटेल व्यवसाय, वाहतूक आणि रोजगाराच्या संधींनाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी सावंतवाडी एक्स्प्रेस ही केवळ दोन टर्मिनलना जोडणारी रेल्वे नसून कोकणातील लाखो कुटुंबांची मने जोडणारी सेवा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. मुंबईत शिक्षण आणि नोकरीनिमित्त राहणाऱ्या कोकणवासीयांचा आपल्या गावाशी संपर्क अधिक सुलभ होण्यास या सेवेची मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
‘कोकणचा विकास थांबणार नाही’ : एकनाथ शिंदे
सावंतवाडी एक्स्प्रेसमुळे मुंबई आणि कोकणातील संपर्क अधिक मजबूत होऊन कोकणच्या पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. गणेशोत्सवापूर्वी ही रेल्वे सेवा सुरू झाल्याने कोकणवासीयांसाठी ही मोठी भेट असल्याचे त्यांनी सांगितले.
कोकणाला निसर्गसौंदर्य, विस्तीर्ण समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले, धार्मिक स्थळे आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला आहे. जलद आणि सुलभ दळणवळणामुळे पर्यटनस्थळे अधिक सहज उपलब्ध होतील. त्यामुळे स्थानिक पर्यटन व्यवसाय, हॉटेल उद्योग, वाहतूक सेवा आणि रोजगाराच्या संधींना प्रोत्साहन मिळेल, असे शिंदे यांनी सांगितले.
मुंबईतील रेल्वेच्या जागांवरील अतिक्रमणे हटविताना संबंधित नागरिकांचे योग्य पद्धतीने पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे केली.
अशी असेल मुंबई-सावंतवाडी एक्स्प्रेस
मध्य रेल्वेकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ते सावंतवाडी रोड दरम्यान ही नवीन दैनंदिन एक्स्प्रेस चालविण्यात येणार आहे. उद्घाटनपर विशेष गाडी क्रमांक ०१००१ सीएसएमटीहून रवाना होऊन दुसऱ्या दिवशी मध्यरात्री २ वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.
या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांवर थांबे असतील.
गाडीमध्ये एक वातानुकूलित प्रथम श्रेणी, दोन वातानुकूलित द्वितीय श्रेणी, तीन वातानुकूलित तृतीय श्रेणी, चार शयनयान, चार सामान्य द्वितीय श्रेणी, एक द्वितीय आसन श्रेणीसह गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅनचा समावेश आहे.
मुंबई आणि कोकणातील दळणवळण अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने ही दैनंदिन सेवा महत्त्वपूर्ण पाऊल मानली जात असून, कोकणवासीयांसाठी ही रेल्वे सेवा मोठी सुविधा ठरणार आहे.







