सावंतवाडी ( प्रतिनिधी ) | सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा आज पुरस्कार निवड समितीच्या बैठकीत करण्यात आली. पत्रकारितेतील उत्कृष्ट व उल्लेखनीय योगदानाची दखल घेत विविध क्षेत्रांतील पत्रकार व छायाचित्रकारांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
यामध्ये वैनतेयकार मे. द. शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार दैनिक सकाळचे पत्रकार रूपेश हिराप यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच माजी आमदार व ज्येष्ठ पत्रकार कै. जयानंद मठकर स्मृती पुरस्कार दैनिक तरुण भारतच्या उपसंपादक मंगल नाईक-जोशी यांना जाहीर झाला आहे.
कै. पांडुरंग स्वार स्मृती ‘जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ पत्रकार अभय पंडीत यांना, तर नाट्यकर्मी कै. बाप्पा धारणकर स्मृती पुरस्कार दैनिक सनातनचे पत्रकार संतोष परब यांना जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय आदर्श समाजसेवक कै. चंदू वाडीकर स्मृती पुरस्कार कोकणसादचे उपसंपादक भगवान शेलटे यांना जाहीर करण्यात आला आहे.
तसेच ज्येष्ठ छायाचित्रकार कै. मुरलीधर उर्फ बंडोपंत भिसे स्मरणार्थ छायाचित्रकार पुरस्कार हेमंत काळसेकर यांना जाहीर करण्यात आल्याची माहिती सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर यांनी दिली.
सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत पुरस्कार निवड समितीची निवड करण्यात आली होती. या समितीत मुख्यमंत्र्यांचे माजी जनसंपर्क अधिकारी सतीश पाटणकर, पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. बी. भारमल, कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष दीपक पटेकर, ज्येष्ठ विधीज्ञ शामराव सावंत, ज्येष्ठ पत्रकार शिवप्रसाद देसाई, गतवर्षीचे आदर्श पत्रकार विजेते नागेश पाटील तसेच पदसिद्ध सदस्य म्हणून तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर, सचिव विजय राऊत आणि खजिनदार रामचंद्र कुडाळकर यांचा समावेश होता.
या निवड समितीची बैठक आज पत्रकार कक्षात पार पडली. बैठकीत पुरस्कारांच्या नावांवर सविस्तर चर्चा करून पात्र पत्रकारांची निवड करण्यात आली. बैठकीच्या सुरुवातीला प्रास्ताविक सचिव विजय राऊत यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहसचिव विनायक गांवस यांनी मानले.





