मच्छीमारांच्या पारंपरिक ज्ञानासह शास्त्रोक्त अभ्यास; कायद्यात बदलासाठी केंद्राकडे पाठपुरावा
मालवण | प्रतिनिधी
किनारपट्टी भागात अंबरग्रीस अर्थात ‘व्हेल माशाची उलटी’ सापडण्याच्या घटनांमध्ये मागील काही वर्षांत वाढ झाली आहे. या पदार्थाच्या कथित तस्करीप्रकरणी अनेक मच्छीमार आणि स्थानिक नागरिकांवर गुन्हे दाखल झाल्याने अंबरग्रीसबाबत प्रशासन, मच्छीमार आणि सर्वसामान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरसमज निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर अंबरग्रीसचा सखोल आणि शास्त्रोक्त अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्रातील मत्स्य व्यवसाय, वनविभाग, संशोधन आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचा विशेष अभ्यास गट स्थापन करण्यात आला असल्याची माहिती नगरसेवक रविकिरण तोरसकर यांनी दिली.
दरम्यान, अंबरग्रीस या संवेदनशील विषयावर मच्छीमार समाजाच्या हिताचा आणि कायदेशीर चौकटीतला धोरणात्मक तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल मार्गताम्हणे, गुहागर येथील निवासस्थानी मच्छीमार समाजाच्या वतीने माजी आमदार विनय नातू यांचे विशेष आभार मानण्यात आले. यावेळी चिपळूण येथील सामाजिक कार्यकर्ते प्रसाद तोरसकर उपस्थित होते.
अंबरग्रीस हा स्पर्म व्हेल या सागरी सस्तन प्राण्याच्या पचनसंस्थेशी संबंधित नैसर्गिकरित्या तयार होणारा पदार्थ आहे. स्पर्म व्हेल हा वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ अंतर्गत संरक्षित प्राणी असल्याने त्याच्याशी संबंधित पदार्थाबाबतही कायदेशीर निर्बंध लागू होतात. मात्र, अंबरग्रीसची ओळख, त्याचे स्वरूप आणि त्यावरील कायदेशीर तरतुदी याबाबत तज्ज्ञ तसेच मच्छीमार समाजात विविध मतप्रवाह आहेत.
अंबरग्रीसची सत्यता तपासण्यासाठी उपलब्ध असलेल्या यंत्रणांच्या मर्यादा आणि योग्य माहितीचा अभाव यामुळे काही प्रकरणांमध्ये कायद्याचा गैरवापर होत असल्याचे चित्र समोर येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे या विषयाचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून वस्तुनिष्ठ माहिती समोर आणणे आवश्यक असल्याचे अभ्यास गटाच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे.
या अभ्यास गटाला भारतातील राष्ट्रीय स्तरावरील मत्स्य संशोधन केंद्रांमधील मान्यवर शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन मिळत आहे. अंबरग्रीसचा अभ्यास करताना केवळ वैज्ञानिक माहितीच नव्हे, तर किनारपट्टी भागातील मच्छीमारांचे पारंपरिक ज्ञान आणि अनुभव यांचाही विचार केला जाणार आहे.
गुहागरचे माजी आमदार विनय नातू या अभ्यास गटाला मार्गदर्शन करत असून, या विषयाचा प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर पाठपुरावा करत आहेत. अभ्यास गटाने संकलित केलेली माहिती प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आली असून, त्याआधारे अंबरग्रीसबाबतच्या कायदे आणि धोरणांमध्ये आवश्यक ते सकारात्मक बदल होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
संबंधित कायद्यात आवश्यक सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारकडे खासदार नारायण राणे आणि खासदार विनोद तावडे यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला जाणार असल्याचे विनय नातू यांनी स्पष्ट केले. तसेच, या विषयासंदर्भातील आवश्यक माहिती महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांनाही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.





