रत्नागिरी : पाली ते आंबा घाट मार्गाच्या काँक्रिटीकरणाला वर्ष-दीड वर्षाचा कालावधी होत नाही तोच आंबा घाटातील काँक्रिट रस्त्याला तडे गेल्याचे समोर आले आहे. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसात आंबा घाटातील रस्त्याचा काही भाग ढासळल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
सध्या आंबा घाटातून एकेरी वाहतूक सुरू असून अवजड वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. तसेच रात्रीच्या वेळेस एसटी बस वाहतूकही पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. पाली ते साखरपा आणि साखरपा ते आंबा घाटातील काही अंतरापर्यंत काँक्रिटीकरणाचे काम करण्यात आले आहे.
मात्र घाट चढताना दख्खनवाडीपासून पुढे चढावावरील काँक्रिट रस्त्याला ठिकठिकाणी तडे गेल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अवघ्या वर्ष-दीड वर्षातच रस्त्याच्या स्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
एकीकडे कोट्यवधी रुपये खर्च करून रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जाते, तर दुसरीकडे इतक्या कमी कालावधीत रस्त्याला तडे जात असतील, तर या विकासकामांना नेमके काय नाव द्यायचे? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. रस्त्याच्या कामाची गुणवत्ता, वापरण्यात आलेले साहित्य आणि कामाच्या दर्जाची सखोल तपासणी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.







