वैभववाडी प्रतिनिधी (कोकणशक्ती डिजीटल ) वैभववाडी :-वैभववाडीतील नाधवडे येथील अरविंद सावंत सरदार माध्यमिक विद्यालय येथे आज ‘शाळा वाचवा – शिक्षण वाचवा’ या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली. ग्रामीण भागातील शाळांचे अस्तित्व आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न केंद्रस्थानी ठेवून ही बैठक घेण्यात आली.
या बैठकीस ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गावातील पालक, शिक्षणप्रेमी नागरिक तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या भूमिका मांडल्या. विशेष बाब म्हणजे या सभेसाठी मुंबईहून संस्थेचे पदाधिकारी उपस्थित राहिले होते. त्यांनी शासन निर्णयांचे परिणाम, शाळा टिकवण्याची गरज आणि पुढील आंदोलनाची दिशा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
बैठकीदरम्यान सर्व पालक व शिक्षणप्रेमी नागरिकांनी सोमवार, दिनांक ५ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याची तयारी दर्शविली. ग्रामीण विद्यार्थ्यांचे शिक्षण वाचवण्यासाठी आणि शाळा बंद करण्याच्या निर्णयाला ठाम विरोध करण्यासाठी एकजुटीने लढा देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
‘शाळा वाचवा – शिक्षण वाचवा’ या आंदोलनाला नाधवडे ग्रामस्थांनी दिलेला प्रतिसाद येत्या मोर्चाला अधिक बळ देणारा ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.





