वेंगुर्ला प्रतिनिधी (कोकणशक्ती डिजीटल ) श्री सरस्वती विद्यालय, आरवली टांक (ता. वेंगुर्ला) येथे ५ जानेवारी रोजी सिंधुदुर्गनगरी येथे होणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांची आढावा बैठक संपन्न झाली. शासनाच्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शाळांच्या भवितव्यावर निर्माण झालेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर ‘शाळा वाचवा – शिक्षण वाचवा’ या आंदोलनाच्या अनुषंगाने ही बैठक घेण्यात आली.
या बैठकीस ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गावातील पालक, शिक्षणप्रेमी नागरिक तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या भावना व्यक्त केल्या. ग्रामीण विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरक्षित ठेवण्यासाठी एकजुटीने लढा देण्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली.
बैठकीदरम्यान सर्व पालक व शिक्षणप्रेमी नागरिकांनी सोमवार, दिनांक ५ जानेवारी २०२६ रोजी सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आलेल्या विराट मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याची तयारी दर्शविली. ग्रामीण शाळांचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि शिक्षणाचा हक्क अबाधित राखण्यासाठी हा मोर्चा निर्णायक ठरणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
‘शाळा वाचवा – शिक्षण वाचवा’ या हाकेला आरवली टांक ग्रामस्थांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद येत्या आंदोलनाला अधिक बळ देणारा ठरणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.





