कुडाळ प्रतिनिधी – एन. व्ही. कुलकर्णी विद्या मंदिर, पांग्रड या संस्थेच्या वतीने तसेच पांग्रड आणि निरुखे या दोन्ही गावांतील प्रमुख ग्रामस्थांच्या उपस्थितीत ‘शाळा वाचवा – शिक्षण वाचवा’ या विषयावर महत्त्वाची संयुक्त सभा आयोजित करण्यात आली. या सभेला दोन्ही गावांचे सरपंच, पोलीस पाटील, तसेच सर्व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामीण भागातील शाळांचे अस्तित्व धोक्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षण वाचवण्यासाठी एकत्रितपणे लढा देण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. सभेदरम्यान सोमवार, दिनांक ५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या विराट मोर्चामध्ये पांग्रड आणि निरुखे दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी पूर्ण ताकदीने सहभागी होण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला.
या सभेस संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय आर. टी. मार्गज तसेच ‘शाळा वाचवा – शिक्षण वाचवा’ आंदोलनाचे अध्यक्ष संजय वेतुरेकर प्रमुख उपस्थित होते. याशिवाय संस्थेचे सर्व संचालक, तसेच निरुखेचे सरपंच औदुंबर मार्गज आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
ग्रामीण विद्यार्थ्यांचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि शाळा बंद करण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी एकजुटीने रस्त्यावर उतरण्याचा संदेश या सभेतून देण्यात आला. दोन्ही गावांचा हा एकसंध प्रतिसाद येत्या मोर्चाला निश्चितच बळ देणारा ठरणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.





