सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी)
गावागावातील अनुदानित शासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयान्वये बंद पडत चालल्याचा आरोप करत, या निर्णयाविरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘शाळा बचाव आंदोलन’ छेडण्यात आले आहे. या आंदोलनाअंतर्गत सोमवार, ५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी साडे दहा वाजता ओरोस येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा – मुख्य हायवे येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.
या मोर्चामध्ये ग्रामस्थ, पालक, शिक्षणप्रेमी नागरिक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. पटसंख्येच्या कारणावरून अनुदानित शाळा बंद करण्याचा घाट घातला जात असून, त्यामुळे ग्रामीण भागातील शिक्षणव्यवस्थेला मोठा फटका बसत असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
या मोर्चाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे, गावातील शाळा बंद करणारे जाचक शासन निर्णय रद्द करावेत किंवा त्यामध्ये सकारात्मक बदल करावेत, जेणेकरून शिक्षणाचे विकेंद्रीकरण अबाधित राहील, खेड्यांतून शहरांकडे होणारे स्थलांतर थांबेल, ग्रामीण जीवनात सकारात्मक बदल घडेल आणि मुलींचे शिक्षण खंडित होणार नाही.
“शाळा वाचल्या तर शिक्षण वाचेल” हा संदेश देत, गरीब, कष्टकरी, शेतकरी व बहुजन समाजाच्या शिक्षणाचा मार्ग बंद होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील जनतेने एकजुटीने उठाव केल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
या आंदोलनात सर्व शिक्षणप्रेमी नागरिकांनी सहभाग घेऊन, आपण ज्या शाळांमध्ये शिकलो त्या शाळा अबाधित ठेवण्यासाठी शासनाने योग्य पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
सदर आंदोलनाची माहिती शाळा वाचवा, शिक्षण वाचवा मंच, सिंधुदुर्गचे अध्यक्ष श्री. संजय वेतुरेकर, सचिव श्री. महेश पाटोळे तसेच समन्वय समितीच्या वतीने देण्यात आली असून, जिल्ह्यातील जनतेने उत्स्फूर्तपणे या मोर्चामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





