मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील चौके गावच्या सुकन्या आणि पुणे येथील मेडिकल योग थेरेपिस्ट व योग प्रशिक्षक दीपिका आंबेरकर यांना सिक्स सेंथ रिसर्च असोसिशन व होलिस्टिक मेडिसिन आणि आयुष कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सिल्वर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. योग क्षेत्रातील कामगिरी तसेच पर्यायी औषधोपचार व समग्र उपचार पद्धतीविषयी सेमिनार मधील मौल्यवान योगदानाबद्दल दीपिका आंबेरकर यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
मुंबई येथे आयोजित प्राचीन व आधुनिक उपचार राष्ट्रीय आयुष संमेलन व पुरस्कार वितरण समारंभात दीपिका आंबेरकर यांना मान्यवरांच्या हस्ते सिल्वर पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी आयुष फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. पी. पुष्कर, सिक्स सेंथ रिसर्च असोसिशनचे अध्यक्ष बी. कुमार, ऍक्यूपंक्चर तज्ज्ञ डॉ. पी. बी. लोहिया आदी मान्यवर उपस्थित होते.
दीपिका आंबेरकर या पुणे येथे सन २०१५ पासून योग व मेडिकल योग क्षेत्रात कार्यरत असून योग अभ्यास व प्रशिक्षण, मेडिकल योग, शिबीरे यांच्या माध्यमातून त्या सेवा देत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल दीपिका आंबेरकर यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.




