आरवली (ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग) येथील श्री देव वेतोबा देवस्थान हे नोंदणीकृत न्यास असून त्याची नोंदणी क्रमांक ए–८ (सिंधुदुर्ग) असल्याची माहिती देवस्थान कमिटीने दिली आहे. देवस्थान तसेच त्याअंतर्गत येणाऱ्या इतर देवस्थानांबाबत सोशल मीडियावर प्रसारित होत असलेले काही व्हिडिओ, युट्युब रील्स तसेच प्रिंट मीडियातील बातम्या या कपोलकल्पित, दिशाभूल करणाऱ्या व बदनामीकारक असल्याचे निदर्शनास आल्याने देवस्थान कमिटीने यासंदर्भात जाहीर नोटीस प्रसिद्ध केली आहे.
देवस्थान कमिटीच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या रीतसर लेखी पूर्वपरवानगीशिवाय देवस्थानाबाबत शूटिंग, फोटोग्राफी, व्हिडिओ तयार करणे, फोटो वितरीत करणे, सोशल मीडिया किंवा प्रिंट मीडियात बातम्या प्रसिद्ध करणे, तसेच पुस्तके प्रकाशित करणे हे बेकायदेशीर व नियमबाह्य आहे.

https://www.instagram.com/p/DS99Y20DVUP/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
कोणतीही व्यक्ती किंवा व्यक्तिसमूह देवस्थान कमिटीची परवानगी न घेता देवस्थानाबाबत चुकीची माहिती प्रसारित करत असल्यास, खोटे आरोप करून बदनामी करत असल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्ती किंवा समूहावर राहील, असेही नोटीसीत नमूद करण्यात आले आहे.
या नियमांचे उल्लंघन करून कोणीही आगळीक केल्यास संबंधितांविरोधात दिवाणी व फौजदारी स्वरूपाची कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा कडक इशाराही श्री देव वेतोबा देवस्थान कमिटीने दिला आहे. सर्व नागरिकांनी व माध्यम प्रतिनिधींनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.





