मालवण शहरातील शिक्षण क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे श्री. नारायण अनंत देसाई टोपीवाला ज्युनियर कॉलेज, मालवण या नामवंत शिक्षणसंस्थेच्या स्थापनेला सन २०२५ मध्ये ५० वर्षे पूर्ण होत आहेत. १९७५ साली सुरू झालेल्या या कॉलेजने गेल्या पाच दशकांत सातत्यपूर्ण प्रगती साधत शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे.
या गौरवशाली वाटचालीत अनेक कर्तृत्ववान प्राचार्य, समर्पित शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अमूल्य योगदान लाभले आहे. त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच टोपीवाला कॉलेजने गुणवत्तेचा ठसा उमटवत हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले आहे.
या ऐतिहासिक परंपरेच्या सन्मानार्थ कॉलेजचा ‘सुवर्णमहोत्सवी संवत्सरपूर्ती सोहळा’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्याचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून सोमवार, दिनांक २९ डिसेंबर २०२५ रोजी कॉलेजच्या माजी शिक्षकांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यास गेल्या पन्नास वर्षांतील ४० हून अधिक माजी प्राचार्य, माजी शिक्षक व माजी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहणार असून, टोपीवाला परिवारातील सुमारे दोन हजार विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि विद्यमान शिक्षकवर्ग या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरणार आहेत.
कॉलेजच्या सुवर्णमहोत्सवी वर्षपूर्तीचा हा सोहळा म्हणजे संस्थेच्या उज्ज्वल परंपरेचा, शैक्षणिक योगदानाचा आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाचा गौरव आहे.
कॉलेजचे प्राचार्य श्री. लक्ष्मण वसंत वळंजू तसेच मालवण एज्युकेशन सोसायटी, मालवण यांच्या वतीने, १९७५ ते २०२५ या कालावधीतील सर्व माजी विद्यार्थ्यांना या ऐतिहासिक, स्नेहपूर्ण आणि प्रेरणादायी सुवर्णमहोत्सवी सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहण्याचे विनम्र आवाहन करण्यात आले आहे.
आपल्या लाडक्या कॉलेजच्या सुवर्णमहोत्सवी आनंदात सहभागी व्हा आणि या सोहळ्याला अविस्मरणीय स्वरूप द्या, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.







