वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय; १६ टन व त्यापेक्षा अधिक वजनक्षमतेच्या वाहनांना निर्बंध
रत्नागिरी, दि. ८ : प्रतिनिधी :
गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, तसेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील संभाव्य वाहतूक कोंडी टाळता यावी, यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत महामार्गावर १६ टन किंवा त्यापेक्षा अधिक वजनक्षमता असलेल्या सर्व प्रकारच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. परिवहन विभागाने यासंदर्भातील आदेश जारी केला आहे.
गणेशोत्सवाच्या काळात कोकणाकडे येणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडूनही प्रवाशांच्या सोयीसाठी मोठ्या संख्येने जादा बसेस सोडण्यात येतात. त्याचबरोबर मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह विविध शहरांतून खासगी वाहनांनी मोठ्या प्रमाणावर चाकरमानी आणि भाविक कोकणाकडे रवाना होतात. अशा परिस्थितीत अवजड वाहने, ट्रेलर्स तसेच रेती-वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वाढते.
ही परिस्थिती लक्षात घेऊन मोटार वाहन अधिनियमातील तरतुदींनुसार अवजड वाहनांच्या वाहतुकीवर कालबद्ध निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवातील गर्दीच्या काळात महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.
या कालावधीत राहणार निर्बंध
११ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री ००.०१ वाजल्यापासून १५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री २३.०० वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी राहणार आहे.
त्यानंतर १८ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते रात्री ११, १९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते रात्री ११ तसेच २० सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेपर्यंत निर्बंध लागू राहतील.
तसेच २५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून २६ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ८ वाजेपर्यंत अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध असतील.
जीवनावश्यक सेवांना निर्बंधातून वगळले
गणेशोत्सवातील वाहतूक नियमन करताना जीवनावश्यक वस्तू आणि अत्यावश्यक सेवांचा पुरवठा विस्कळीत होऊ नये, याचीही शासनाने काळजी घेतली आहे. त्यामुळे काही वाहनांना या निर्बंधातून सवलत देण्यात आली आहे.
जेएनपीटी आणि जयगड बंदरातून आयात-निर्यात होणाऱ्या मालाची वाहतूक करणारी वाहने, तसेच दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा एलपीजी, औषधे, लिक्विड ऑक्सिजन, भाजीपाला, अन्नधान्य आणि नाशवंत मालाची वाहतूक करणारी वाहने या निर्बंधातून वगळण्यात आली आहेत.
याशिवाय रुग्णवाहिका, पोलीस वाहने, अग्निशामक दल, आपत्ती व्यवस्थापन आणि अन्य अत्यावश्यक सेवांची वाहने निर्बंधमुक्त राहणार आहेत.
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरण आणि दुरुस्तीच्या कामासाठी आवश्यक साहित्य वाहून नेणाऱ्या वाहनांनाही सवलत देण्यात आली आहे. मात्र, अशा वाहनांकडे वाहतूक पोलीस किंवा महामार्ग पोलिसांचे आवश्यक प्रवेशपत्र असणे बंधनकारक राहणार आहे.
परिस्थितीनुसार निर्बंध शिथिल करण्याचे अधिकार
स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यकता भासल्यास निर्बंधांमध्ये शिथिलता देण्याचे अधिकार नवी मुंबईचे पोलीस आयुक्त तसेच संबंधित जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत.
गणेशोत्सवासाठी कोकणाकडे मोठ्या संख्येने जाणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवासात वाहतूक कोंडीचा अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी घेतलेल्या या निर्णयामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी आणि पर्यायी मार्गांवरील वाहतूक नियोजन हेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.






